आमदार राम शिंदेंविरोधात राजेंद्र पवार मैदानात, गाळप हंगामावरून पवारांनी फेसबुकवरून सांगितली मन की बात
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। यंंदाच्या ऊस गाळप हंगामावरून राज्यात मोठे वादळ उठले आहे.भाजपा नेते तथा आमदार राम शिंदे यांनी इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रोविरोधात सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. आमदार रोहित पवार विरूद्ध आमदार राम शिंदे हा संघर्ष तापला आहे. अश्यातच आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे आमदार शिंदेंविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या राज्यात चर्चेत आली आहे.
यंदा अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे याकडे लक्ष वेधताना राजेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, सुरुवातीला १ ऑक्टोबर तारीख पेपरमध्ये आल्यामुळे तोडणी मजूर ते कारखाना तयार ठेवण्याची धामधूम झाली आणि अचानक हंगाम १५ ऑक्टोबर शिवाय चालवायचा नाही अशी नोटीस निघाली. कारखाना चालू नसतानासुद्धा स्वतःला शेतमजूराचा मुलगा, अल्पभूधारक शेतकरी, प्राध्यापक म्हणवून घेणाऱ्यांनी बारामती ॲग्रो कारखान्यावर तक्रार केली.
नीटसे माहितीही नसलेले कायदे, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे,रस्त्यावर ऊस दिसला की केस करण्याचे व न वापरलेल्या इसेंशियल कमोडिटी ॲक्ट आदींचा बडगा उभारला, अगदी तक्रारही केली पण कायद्याचा कोणताही भंग केला नसल्याने त्यातून क्लीन चीटही लगेच मिळाली.
लोकप्रतिनिधी व सरकार, अधिकारी यांनी मदतीच्या भावनेने पाहिले पाहिजे
वास्तविक हे कायदे ऊस कमी असताना हवेत, अतिरिक्त ऊस झाल्यावर नकोत.साखर कारखानदारी ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा आहे.कारखाना जेवढा लवकर चालू तेवढे पैसे शेतकऱ्याला,ऊस तोडणी करणाऱ्यांना.तरुण ट्रॅक्टर वाहतूक करतात,अनेक ड्रायव्हर व ग्रामीण भागातील असंघटित मजूर व व्यवसाय यावर अवलंबून असतात.याकडे लोकप्रतिनिधी व सरकार, अधिकारी यांनी मदतीच्या भावनेने पाहिले पाहिजे असे म्हणत राजेंद्र पवार यांनी लक्ष वेधले आहे.
नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले व राजाने छळले तर तक्रार कोणाकडे करायची?
आता धो-धो पाऊस चालू झाला आहे, सिझन लांबलाय.पुढे उन्हाच्या तडाख्यात तोडणीवाले निघून जातात.तोडीसाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड पडतो, ऊसाचे वजन व रिकव्हरी घटते, याचे चटके शेवटी कोणाला? एअर कंडीशनमध्ये घेतलेले निर्णय कदाचित असेच असतील. पूर्वी एक म्हण होती, नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले व राजाने छळले तर तक्रार कोणाकडे करायची? याची प्रचिती येताना दिसतेय असे म्हणत राजेंद्र पवारयांनी आमदार राम शिंदेंचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
भाजपा नेते आमदार राम शिंदेंनी का केलीय तक्रार ?
यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता, परंतू इंदापुर तालुक्यातील बारामती ॲग्रो साखर कारखाना 10 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. सदर कारखान्याने शासनाचे आदेश डावलून व नियमाचे उल्लंघन केले आहे. अशी तक्रार आमदार राम शिंदे यांनी पुराव्यासह सरकारकडे केली आहे.
साखर आयुक्त कार्यालयाचे क्लिन चिट
आमदा राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर साखर आयुक्त कार्यालयाने बारामती ॲग्रो साखर कारखाना भेट केली. गळीत हंगाम सुरु नसून मोळी पुजनाचा कार्यक्रम झाल्याचा अहवाल सादर करत कारखान्याला क्लीन चीट दिली आहे.