Ram Shinde : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार राम शिंदे मैदानात, ‘या’ ज्वलंत प्रश्नावर आमदार राम शिंदेंचे विखे-पाटलांना साकडे !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 25 ऑक्टोबर 2022 । खरिप हंगामातील हातात तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे वाया गेला.यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे,आमचं जे नुकसान झालयं ते पंचनाम्याविना राहू नये.ज्या शेतकऱ्यांंचं नुकसान झालयं, त्या सर्व शेतकऱ्यांंचा सरसकट पंचनामा करून अहवाल सादर करण्यात यावा.संपूर्ण कर्जत-जामखेड मतदारसंघात नुकसानीची परिस्थिती भीषण आहे. सरकारने तातडीने पंचनामानिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजपा नेते आमदार प्रा राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलहे जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी 24 ऑक्टोबर 2022 रोजी खर्डा परिसराच्या दौर्यावर आले होते. यावेळी आयोजित आढावा बैठकीत अनेक महत्वाच्या प्रश्नाकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात परतीच्या पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे ही बाब पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना कळवली असता, ते तातडीने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या दु:खामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या बांधावर आले त्यामुळे मी त्यांचे जामखेड तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो.
आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की,परतीचा पाऊस अधिक काळ राहिल्यामुळे जामखेड तालुक्यात ज्वारी आणि हरभऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, ज्यांनी केल्या होत्या ती पिके पावसामुळे उगवली नाहीत. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झाल आहे. अजून एक दीड महिना शेतात पेरता येईल अशी परिस्थिती नाहीये, त्यामुळे नापेर क्षेत्र अधिक राहण्याची शक्यता मतदारसंघात निर्माण झाली आहे. त्याची देखील सरकारच्या माध्यमांतून पडताळणी करण्याची आवश्यकता आहे.
रब्बीचा हंगाम आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आपला परिसर रब्बीत येत असल्याने कधी कधी खरिपाचा विमा मिळायला देखील अडचण येते. आमचं मुख्य पीक रब्बी हे जर शासनाने समजलं असेल आणि त्याला जर पेरणीला अडचण येत असेल, पीक घ्यायला अडचण येत असेल, पेरलेलं वाया गेलेलं असेल तर याच्यावर देखील आपल्याला राज्य सरकार म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे असे साकडे आमदार राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना घातले.
शेवटी बोलताना आमदार राम शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने पुर्ण करावेत आणि लवकरात लवकर झालेल्या पंचनाम्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी केली.