जामखेड टाइम्स वृत्तसेवा: कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची असते. युवकांनी स्वतःला अशा पद्धतीने विकसित करावे की जेणेकरून देशाचा नावलौकिक वाढेल, देशाला महाशक्ती बनवण्याच्या दृष्टीने युवा शक्तीने कार्यरत रहावे, असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव यांच्या वतीने पिंपरखेड येथे ६ मार्च ते १२ मार्च २०२४ या कालावीत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित समारोप प्रसंगी डाॅ ससाणे बोलत होते.यावेळी पिंपरखेडच्या सरपंच उषा ओमासे, उपसरपंच अविनाश गायकवाड, कर्जत उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख, डॉ. प्रेरणा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पोपट पवार यांनी शिबिर सप्ताहात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी पुढे बोलताना डाॅ ससाणे म्हणाले की, विचारशक्ती सशक्त करण्यासाठी वाचन आवश्यक आहे, जो अविरत वाचन करतो तो ज्ञानी होतो. माणसाची खरी श्रीमंती ही त्याच्या ज्ञानावरून सिद्ध होते .तसेच ज्ञानासोबत विविध कलाही जोपासता आल्या पाहिजेत, युवकांनी देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी अविरत मेहनत घ्यावी, घवघवीत यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
महाविद्यालय परिसरातील गावांमधील शेतीचे चित्र बदलण्यासाठी कृषि महाविद्यालयातील तज्ञ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. शेतीतील नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी शेतकरी बांधव महाविद्यालयातील तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. आम्ही शेतकरी बांधवांसाठी सदैव तयार आहोत, असे ससाणे म्हणाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.महावीरसिंग चौहाण यांनी सर्व स्वयंसेवकांनी केलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक केले व पुढील वाटचलींसाठी प्रोत्साहन दिले.
पिंपरखेड येथे पार पडलेल्या श्रमसंस्कार शिबिरात स्वच्छता अभियान, महिला दिन, प्रभात फेरी, पथनाट्य, वृक्षारोपण, जलसंवर्धन, पर्यावरण जागृती,व्यसनमुक्ती जागरूकता, कृषी विषय तज्ञांमार्फत व्याख्याने इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर समारोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी मुंडे तर आभारप्रदर्शन कु.सोनाली शिवशरण यांनी केले.