पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानासह राज्यातील १३ ऐतिहासिक गावांतील शाळांचा विकास होणार, १४३०.२० लक्ष रूपये खर्चास सरकारने दिली प्रशासकीय मान्यता – आमदार प्रा राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील महापुरुषांशी संबंधित १३ ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसीत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता जामखेड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा सरकारने समावेश केला आहे. यासाठी सरकारने दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२-२३ अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांशी संबंधित १० ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती.तसेच विधीमंडळ सदस्याच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली होती.त्यानंतर मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सरकारने (१४३०.२० लक्ष ) चौदा कोटी तीस लक्ष वीस हजार रूपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक चोंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ऐतिहासिक गावांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे राज्यातून कौतूक होत आहे.आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे चोंडी शाळेला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. चोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसीत करण्यासाठी शासनाने भरीव निधी मंजुर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या चोंडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सरकारने सर्वाधिक निधी मंजुर केल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सरकारचे आभार मानले आहेत.”
राज्यातील खालील 13 ऐतिहासिक गावांमधील शाळा होणार विकसीत
१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चोंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर. (मंजुर निधी – २,०३,४३,०२५/- रूपये)
२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा परिषद शाळा (मुलींची), मोझरी ता. तिवसा, जि. अमरावती (५५,६८,०००/- रूपये)
३) संत गाडगेबाबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडगांव ता. अंजनगांव सुर्जी जि.अमरावती (४९,६८,०००/- रूपये)
४) शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पापळ, ता. नांदगाव खंडेश्चर, जिल्हा अमरावती (१,७२,०८,००० रूपये)
५) राजर्षी शाहू महाराज जिल्हा परिषद शाळा हिन्दुराव घाडगे विद्या मंदीर. कागल जि. कोल्हापूर (१,११,८६,५४५/- रूपये)
६) वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जिल्हा परिषद शाळा क्र.१ पिंपळगाव बसवंत, ता. निफाड जि.नाशिक. (१,८५,२८,५७२/- रूपये)
७) महात्मा ज्योतिबा फुले- ज्योती सावीत्री – इंटरनॅशल जिल्हा परिषद शाळा खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे. (१,४६,६२,७७४/- रूपये)
८) महर्षि धोंडो केशव कर्वे जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी), शाळा मुरूड, जि. रत्नागिरी. (३७,३५,११५/- रूपये)
९) साने गुरूजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालगड ता. दापोली जि. रत्नागिरी (३,३८,३२,२७६/- रूपये)
१०) लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. १, वाटेगांव ता. वाळवा, जि. सांगली. (१,००,०३,६८०/- रूपये)
११) क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, येडे मच्छिंद्र ता. वाळवा, जि. सांगली (५४.४२,४३५/- रूपये)
१२) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर – प्रतापसिंह हायस्कूल सातारा.(१,२५,८७,६८४/- रूपये)
१३) सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळा, नायगांव ता. खंडाळा, जि. सातारा (१,५४,०३, ५६४/- रूपये)
दरम्यान, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग जारी केलेल्या शासन निर्णयात नेमकं काय म्हटले आहे पाहूयात.
वाचा:
१) पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण ८२२२/प्र.क्र.४१३ / सां. का.४ दि.१७ फेब्रुवारी, २०२३
(२) मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचा प्रस्ताव जा.क्र.मप्राशिप/सशि/ बांध- २०४८/२०२३-२४/१५१७, दि. २९.०५.२०२३
प्रस्तावना :-
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मा. मंत्री, वित्त यांनी सन २०२२-२३ अर्थसंकल्पीय भाषणात महापुरुषांशी संबंधित १० ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती. तसेच विधीमंडळ सदस्याच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास निधी मंजूर झाला असुन त्यातुन ऐतिहासिक गावांच्या शाळा विकसित करण्याकरीता निधी उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्यास मा. मंत्री. सास्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने मान्यता प्रदान केली असून संदर्भ क्र. १ अन्वये प्रशासकीय मान्यतेसह निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने कळविले आहे. त्या अनुषंगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत उपरोक्तप्रमाणे ऐतिहासिक गावांतील १३ शाळा विकसित करण्यासाठी रू. १४३०.२० लक्ष इतक्या खर्चाच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता देवून मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी संदर्भाधिन क्र.२ अन्वये प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्याअनुषंगाने प्रस्तुत १३ शाळा विकसित करण्याकरीता येणाऱ्या एकूण रू. ५४३०.२० लक्ष इतक्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१) राज्यातील महापुरुषांशी संबंधित १३ ऐतिहासिक गावांतील शाळा विकसीत करण्याकरीता रू. १४३०.२० लक्ष चौदा कोटी तीस लक्ष वीस हजार इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर बाबीकरीता आवश्यक असणारा खर्च उपरोक्त प्रमाणे निधी पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून भागविण्यात यावा.
3. सदर शासन निर्यय वित्तिय अधिकार नियमपुस्तीका १९७८ भाग पहिला उपविभाग पाच परि. १३४ अन्वये विभागास असलेल्या अधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६१० / व्यय-५, दिनांक २६.०६.२०२३ अन्वये प्राप्त अभिप्रायांच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०७१८४८१११६२१ असा आहे. हा शासन निर्णय अवर सचिव प्रविण मुंढे यांच्या डिजीटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.