खळबळजनक : आमदार रोहित पवार समर्थक सराईत गुन्हेगाराकडून आमदार राम शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, राज्याच्या राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार हा संघर्ष तापलेला असतानाच आमदार रोहित पवार यांचा समर्थक असलेल्या एका सराईत गुन्हेगाराने फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रा.राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी होत आहे. यंदा साजरी होणारी जयंती शासनस्तरावरून साजरी केली जाणार आहे. त्यादृष्टीने स्वागताध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र चोंडी येथे जय्यत तयारी सुरू आहे. जयंती उत्सवावरून आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार यांच्यात संघर्ष सुरू आहे. अश्यातच आमदार प्रा.राम शिंदे यांना एका सराईत गुन्हेगारांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धमकी प्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 मे 2023 रोजी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्याकरिता श्रीक्षेत्र चोंडी येथे गेलो होतो. त्यावेळी मला सागर गवसणे यांच्या 9096 248302 या मोबाईलवरून मला फोन आला त्यावेळी तो मला म्हणाला की, तुम्ही आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या जवळ आहात, त्यांना जुळवून घ्यायला सांगा,नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. त्यावेळी मी काहीही न बोलता फोन कट केला. त्यानंतर मी आमदार प्रा राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सागर गवसणे याने फोन केल्याची माहिती दिली.
त्यानंतर मला अशी माहिती समजली की, सागर गवसणे याने फेसबुकवरील ‘मैत्रीग्रुप’ या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रा.राम शिंदे साहेब व काही अपरिचित व्यक्तींचे नाव घेऊन तुम्हास घरात घुसून मारीन अशी धमकी देत दोन पक्षांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा अक्षेपाहार्य मजकुर असलेला व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजले असता, तो व्हिडीओ मी फेसबुकवर पाहिला. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला सराईत गुन्हेगार सागर गवसणे याच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून कलम 504,505(2),506(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
आमदार प्रा.राम शिंदे व कार्यकर्त्यांना फेसबुक लाईव्हद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारा सराईत गुन्हेगार सागर गवसणे ऊर्फ सागर मराठा याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी, शिंदे समर्थकांमधून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, चोंडी येथे होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या नियोजनासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी बघून घेण्याची भाषा वापरत इथे काय चाललयं ना बघतोच आता, असे वक्तव्य केले होते, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला होता. त्यातच सागर गवसणे या सराईत गुन्हेगारांकडून आमदार प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत आरोपी सागर गवसणे हा आमदार रोहित पवार यांचे नाव घेत असल्याचे दिसत आहे. रोहित इज माय लाईफ, रोहित पवार आपला जीवय असे म्हणत असल्याचे दिसत आहे.एकुणच घडामोडींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.