खळबळजनक : पुण्याच्या सदाशिव पेठेत MPSC च्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला, भरदिवसा घडलेल्या घटनेने उडाली खळबळ ! पहा Video
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : प्रेमप्रकरणातून दर्शना पवार हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत MPSC च्या विद्यार्थीनीवर भरदिवसा MPSC करणाऱ्या एका तरूणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सदाशिव पेठेत घडली. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेतून दुचाकीवरून मित्रासोबत जात असलेल्या एका MPSC च्या विद्यार्थीनीवर एका तरूणाने कोयत्याने हल्ला केला आहे. त्यात विद्यार्थीनी जखमी झाली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या काही तरूणांनी प्रसंगावधान राखत मुलीला वाचवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
नेमकी घटना काय ?
पुणे शहरातील सदाशिव पेठ भागातून एक तरूणी जात असताना शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) या तरूणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. सकाळी 10 वाजता ही घटना घडली. तरूणाने हल्ला करताच तरूणी रस्त्यावर धावत सुटली होती, वाचवा वाचवा म्हणून ती लोकांकडे मदत मागत होती. परंतू तिच्या मदतीला तात्काळ कोणीच आले नाही.
ती धावत असतानाच तिच्यावर हल्लेखोर तरूण हल्ला करणार तोच दोन तरूण तिच्या मदतीला आले. शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत दोन युवकांनी तरुणीचा जीव वाचला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या आरोपीला चोप देत पेरू गेट पोलीस चौकी येथे नेण्यात आलं एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.