जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदार गट यांच्या युतीची सत्ता स्थापन झाली आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उध्दव ठाकरे हा संघर्ष राज्यात अधिक तापला आहे. या संघर्षात शिंदे हे आपला गट मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खरी शिवसेना आमचीच असा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे राज्यात वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात या राजकीय नाट्याचे काय पडसाद उमटणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. नेवासा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री शंकरराव गडाख हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सत्तांतरानंतर गडाख यांनी ठाकरेंसोबत जायचं की शिंदेंसोबत जायचं याबाबत आज मोठी घोषणा केली आहे.
आमदार शंकरराव गडाख यांनी आज सोनई या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेत आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. गडाख यांनी उध्दव ठाकरेंनाच साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता असो अथवा नसो आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार अशी घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना आमदार शंकरराव गडाख म्हणाले की, उध्दव ठाकरेंसोबत जायचं की एकनाथ शिंदेंसोबत या द्विधा मनस्थितीत होतो, परंतू राजकारणात केवळ फायदा – तोटा बघून चालत नाही. त्यामुळे आपण सत्तेत असो किंवा नसो आपण कायम उध्दव ठाकरेंसोबत राहणार असा निर्णय त्यांनी बोलून दाखवला.
घरातलेच आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंनीच हे केलं की काय अशीही चर्चा होती. त्यामुळे आपण ठाम राहीलो तर निर्णय चुकतो की काय अशीही धाकधुक होती. परंतु कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा आनंद आहे. मंत्रीपद गेल्यापेक्षा कामं थांबल्याचं दुखः आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग संयमाने हाताळला तसं आपणही संयमानं पुढं जावू,असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची अगोदरच चर्चा होती. शिवसेनेचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे नाराज होते. पुढे त्यांनी सांगितलं की मलाही गुहावटीमधून फोन आले. अनेक आमदार येणार आहेत तुम्हीही या असा फोन आला होता असे गडाख म्हणाले.