शेवगाव पाथर्डीत अतिवृष्टीने झोडपले; अनेक गावांमध्ये पाणी शिरले
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील नदीला पुर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हयातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवल्याने या भागाची मोठी दाणादाण उडाली. अनेक भागात या पावसाने मोठे नुकसान केले आहे. नद्यांचे पाणी गावागावात शिरले. अनेक गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागेल. जामखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. (Shevgaon Pathardi heavy rains; Many villages were flooded)
शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमधील घरादारात पाणी शिरल्याने नागरिकांना भीतीच्या छायेखाली रात्र जागून काढावी लागली तर आखेगाव येथील नानी नदीला आलेल्या पुरामुळे नदी पलीकडे जवळपास १०० नागरिक अडकले असून त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे.
शेवगाव महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली असून २४ तासात ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अन्य महसूल मंडळात पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील बहुतांश नद्यांना आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आखेगाव, भगूर, वडुले गावात पुराचे पाणी शिरले आहे. तेथील काही नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अनेकांचे जनावरे, वाहने वाहून गेल्याची माहिती मिळाली असून जोरदार पावसामुळे शेळ्या, मेंढ्या मृत पावल्या आहेत. तालुका प्रशासनाच्या वतीने येत्या चोवीस तासात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाने वतीने देण्यात आल्या आहेत.
आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके हे पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भेटी दरम्यान नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सुचना देण्यात येत आहे.
सोमवारी सायंकाळपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नदी – नाले एक झाले असून अनेक गावांत पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरे वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरडगाव, आखेगाव, पागोरी पिंपळगाव, वाळुंज, खरडगाव, वरुर, भगूर आदी गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळपासून शेवगाव-पाथर्डीसह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. शेवगाव- पाथर्डीच्या डोंगर भागात अतिवृष्टी झाल्याने शेवगाव व पाथर्डी तालुक्यांना पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या गावातील सखल भागात नदीचे पाणी शिरल्याने काही ठिकाणी जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
कोरडगाव येथे गोठ्याचे पाईप अंगावर पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला आहे. ठाकुर पिंपळगाव येथे शेळ्या वाहुन गेल्या आहेत. वरुर गावातही जनावरे वाहुन जाण्याची घटना घडली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. आखेगाव येथील रामकिसन काटे, अमोल काटे, अशोक काकडे, भानुदास पालवे यांची घरे पडली आहेत. अनेक रस्त्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहने अडकून पडली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अगोदर पाऊस नसतांना चिंतेत असलेला शेतकरी अतिवृष्टीने पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.
जामखेड व कर्जत तालुक्यातही सोमवार रात्री पासुन संततधार तर कधी जोरदार सरी बरसत होत्या. रात्रभर मुर पाऊस झाला. जामखेड मंडळात सर्वाधिक 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने जामखेड तालुक्यातील दिघोळ जातेगाव परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आला होता. पुर पाहण्यासाठी सकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. पावसाने लावलेल्या हजेरीने बळीराजा काहीसा सुखावला आहे..