जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 2 जानेवारी 2021 | मैत्रीत कधी काही होईल याचा काही भरवसा नसतो, कट्टर मैत्रीत काही कारणाने बिनसलं की मग हे नातं संपुष्टात येतं परंतू काहीवेळा मैत्रीत आलेली कटुता जर एखाद्याच्या जीवावर उठणारी असेल तर मग त्या मित्रत्वाच्या नात्याला कलंक लागतो. अशीच काहीशी घटना पुण्यातून समोर आली आहे.
पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला ही सुपारी देण्यात आली होती. संबंधित घटना उजेडात येताच पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. (shocking case, police appointed criminal kill police officer, pune crime news)
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांच्या फिर्यादीवरून दत्तवाडी पोलीस ठाण्यात योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) या गुन्हेगाराविरोधात कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. ज्या पोलिस अंमलदाराने योगेश अडसूळला सुपारी दिली होती त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा पोलिस कर्मचारी फरार झाला आहे. नितिन दुधाळ असे फरार पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जीवलग मैत्रीत दुरावा….
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी हे शेजारी शेजारी रहायला होते. त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र, मध्यंतरी दोघांमध्ये काही कारणावरून वाद होण्यास सुरुवात झाली. हे वाद सतत सुरू राहिल्याने नितीन दुधाळ याने सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ याला पोलिस कर्मचारी दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती.
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सुपारी
योगेश अडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच खूनाच्या गुन्ह्यातून पॅरोलवर सुटला होता. नितीन दुधाळ याने अडसुळ याची हडपसर येथे भेट घेतली. त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचारी दिनेश दोरगे यास मारहाण अथवा अपघात करुन गंभीर दुखापत करुन कायमचे अपंगत्व आणण्यासाठी व त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहीन, असे सांगितले. अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितले. तो जातो कोठे, कधी येतो, त्याच्याकडे काही हत्यार आहे का? अशी माहिती काढण्यास सांगितले होते.
योगेश आडसुळ पोलिसांच्या ताब्यात
सराईत गुन्हेगार योगेश अडसूळने सुपारी मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी दिनेश दोरगे यांचा अनेक वेळा पाठलाग केला. नोव्हेंबर 2021 पासून आजपर्यंत हडपसर आणि दत्तवाडी परिसरात हे कटकारस्थान घडले होते. हा प्रकार दिनेश दोरगे यांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी योगेश अडसूळला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने फरासखाना पोलिस स्टेशन येथे अमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन दुधाळ याने दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले.
नितीन दुधाळ फरार..
दत्तवाडी पोलिसांना अशा प्रकारे सुपारी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योगेश आडसुळ या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आडसुळ पोपटासारखा बोलता झाला. त्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करुन त्याचा अपघात घडवून आणण्याचा कट रचल्याची कबुली दिली तसेच यासाठी दुधाळ याने दहा हजार रुपये दिल्याचेही या गुन्हेगाराने कबूल केले. त्यावरुन पोलिसांनी योगेश अडसुळ याला अटक केली आहे. मात्र दुधाळ हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी दत्तवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.