धक्कादायक: अहमदनगरमध्ये बनावट पदवी देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश , 50 ते 60 हजारांना व्हायची बनावट पदवी प्रमाणपत्रांची विक्री, पोलिसांनी केली एकाला अटक, तोफखाना पोलिसांची धडक कारवाई
अहमदनगर : अहमदनगर शहरात बनावट पदवी प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट (Fake degree certificate racket) चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी अशोक सोनवणे (Ashok Sonawane arrest) या आरोपीच्या तोफखाना (Tophkhana police station) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून संगणक व कार्यालयातील कागदपत्रे जप्त केली आहेत.अहमदनगरमध्ये (Ahmednagar) सुरु असलेल्या बनावट पदवी प्रमाणपत्राच्या गोरखधंद्याचे दिल्ली कनेक्शन (Delhi Connection exposed) पोलिस तपासात उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी अशोक नामदेव सोनवणे (Ashok Namdev Sonawane) हा सन 2018 पासून अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरातून रूद्रा एज्युकेशन सोसायटीच्या (Rudra Education society, Balikashram road, Ahmednagar) माध्यमांतून बोगस पदवीचे रॅकेट चालवत होता. त्याने रूद्रा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतून 200 लोकांना दहावी, बारावी व पदवीचे बोगस प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. एका प्रमाणपत्रासाठी तो 50 ते 60 हजार रूपये घेत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
युवकाच्या तत्परतेने झाला बनावट पदवी रॅकेटचा भांडाफोड
अहमदनगरच्या विशाल बाजीराव पारधे (Vishal Bajirao Pardhe) या तरूणाने अशोक सोनवणे याच्याकडून बीएस्सी एमएलटीचे (B.Sc MLT) प्रमाणपत्र घेतले होते. या प्रमाणपत्राच्या व्हेरिफिकेशनमध्ये सदरचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे विशाल पारधे या तरूणाच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच सदर तरूणाने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास केल्यामुळे बनावट पदवी प्रमाणपत्राच्या रॅकेटचा भांडाफोड झाला.
फोन आला अन् अशोक सोनवणे गडबडला.. दिल्ली कनेक्शन उघड
विशाल पारधे यांच्या तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना अहमदनगर पोलिसांनी अशोक सोनवणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून चौकशी सुरु असताना अशोक सोनवणेला एक फोन आला. फोन घेताना तो खूप गडबडला होता. त्याला एका कुरिअर सर्व्हिसमधून फोन आला होता. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी संबंधित कुरिअर पोलिस ठाण्यात आणले. त्या कुरिअरमध्ये दहावी आणि बारावीचे गुणपत्रक होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नावे असलेली चार गुणपत्रके पोलिसांना मिळून आली.सदरचे बनावट प्रमाणपत्र दिल्ली येथून सचिन शर्मा व चेतन शर्मा (Sachin Sharma, Chetan Sharma Delhi) यांनी पाठवल्याची कबुली आरोपी अशोक सोनवणे याने यावेळी पोलिसांना दिली अन बनावट प्रमाणपत्राचे दिल्ली कनेक्शन समोर आले.
आरोपी आशोक सोनवणे हा दहावी व बारावीचे गुणपत्रक देण्याबरोबरच अनेक विद्यापीठांच्या बनावट पदव्यांची विक्री करत असायचा, यासाठी तो 50 ते 60 हजार रूपये एका पदवी प्रमाणपत्रासाठी घेत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीकडून संगणक व कार्यालयातील कागदपत्रे तसेच 50 हजार रूपयांची मोबाईल फोन जप्त केले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके (PSI Samadhan Solanke) हे करत आहेत.
अनेक जण पोलिसांच्या रडारवर
आरोपी अशोक नामदेव सोनवणे हा फक्त अहमदनगर जिल्ह्यात बनावट पदवी प्रमाणपत्र विक्रीचे रॅकेट चालवत होता की त्याचे नेटवर्क संपुर्ण राज्यात सक्रीय आहे ? या रॅकेटमध्ये त्याचे साथीदार कोण कोण आहेत? याचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी अशोक सोनवणे याने 2018 ते 2023 काळात ज्यांना ज्यांना बनावट गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र विकले आहेत त्या सर्वांचा शोध घेणे आवश्यक आहे, बनावट प्रमाणपत्रांच्या अधारे सरकारी सेवेत गेलेल्या बनावट नोकरदारांनाही बेड्या ठोकण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत.