धक्कादायक : मृत्यूनंंतरही यातना पाठ सोडेना, पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा, सोलापूर जिल्ह्यातील घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ झाला वायरल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये धो धो पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागातील नद्यांना पूर आला आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावाला पुरा वेढा पडला आहे. नदीला पुर आल्याने गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून प्रेतयात्रा नेण्याची वेळ आहे. विदारक दृश्य असलेला हा व्हिडीओ वायरल झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. याच तालुक्यातील पितापुर या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक प्रेतयात्रा निघाली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील पितापुर या भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या गावातून वाहणाऱ्या नदीला सध्या पुर आलेला आहे. या नदीवर पुल नसल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या भागात मागील आठवड्यापासून पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.
दरम्यान पितापुर गावातील नदीला पुर आलेला असतानाही नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रेतयात्रा काढल्याचा विदारक दृश्य असलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. गावातील नदीला पुल नसल्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
पुतापुर गावातील पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या प्रेत यात्रेचा जो व्हिडिओ वायरल झाला आहे, त्या व्हिडिओत जवळपास मानेजवळ पाण्यातून प्रेतयात्रा जात असल्याचे दिसत आहे. पाण्याचा मोठा वेग आहे. पाण्यातून जाताना बुडू नये यासाठी अनेकांनी टायरचा आधार घेतल्याचे दिसत आहे. मृतदेह खांद्याच्यावर उचलून हे लोक पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. मृतदेह प्लास्टिकने कव्हर करण्यात आला आहे.
या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या गावातुन पलीकडे जाण्यासाठी कोणताही पुल बांधण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात येथील नागरीकांची मोठी गैरसोय होते. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्स साजरा होत आहे. ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ हा कार्यक्रम सरकार राबवत आहे. त्यातच येथे गावात धड रस्ते नाहीत, पुल नाहीत तर घरापर्यंत तिरंगा कसा पोहचवणार असा प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित होत आहे. अनेकांना मृत्यूनंतरही हाल सोसावे लागत असल्याचे भीषण वास्तव या व्हिडिओमुळे समोर आले आहे.