जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील अहमदनगरसह पाच जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले. कर्जतमधील दोघा अट्टल दरोडेखोरांना अटक करण्याची धडाकेबाज कारवाई पोलिसांनी पार पाडली. या कारवाईत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, बीड या पाच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रस्तेलुट, घरफोड्यांच्या घटना वेगाने वाढल्या होत्या.या भागात दरोडेखोरांकडून अक्षरश: धुमाकुळ घालण्यात आला होता. या टोळीचा शोध घेण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले. या प्रकरणात दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर चौघे जण फरार झाले आहेत.
श्रीगोंदा पोलिसांनी अटक केलेल्या दोघा दरोडेखोरांकडून दरोड्याच्या साहित्यासह दोन दुचाकी असा एक लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण फाटा ते बन पिंपरी या रस्त्यावर करण्यात आली. गहिनीनाथ ऊर्फ ईश्वर्या भोसले (वय32), सोन्या ऊर्फ लाल्या ईश्वर्या भोसले (वय 28) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघे आरोपी कर्जत तालुक्यातील बेलगावी येथील रहिवासी आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण फाट्यापासून ते बनपिंपरी या भागात अहमदनगर – सोलापूर हायवेवर काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी या भागात सायंकाळी धाड टाकली. या ठिकाणी सहा दरोडेखोर आढळून आले मात्र पोलिसांना पाहताच त्यातील चौघांनी पोबारा केला. दोघांना पाठलाग करून पकडण्यात यश आले.
पकडण्यात आलेल्या दोघा दरोडेखोरांविरोधात राज्यातील पाच 26 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याने श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक होत आहे.
ही धडाकेबाज कारवाई DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील सुर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अंकुश ढवळे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, दादासाहेब टाके, दीपाली भंडलकर, प्रशांत राठोड यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित माझी व वैभव गांगर्डे हे करत आहेत.