सहा किलो गांजा जप्त : दोघांना ठोकल्या बेड्या : DYSP आण्णासाहेब जाधव यांची धडक कारवाई
तीन दिवसांत दोन मोठ्या कारवाया
कर्जत : DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या टिमने गांजाविरोधी आणखी एक धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे.या कारवाईत 80 हजार रूपये किमतीचा सुमारे सहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही धडक कारवाई कर्जत तालुक्यातील डिकसळ शिवारात करण्यात आली. (Six kg cannabis seized: Two arrested: DYSP Annasaheb Jadhav and Karjat police crackdown)
ओमिनी गाडीतून गांजाची वाहतूक केली जात असल्याची बातमी DYSP आण्णासाहेब जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कर्जत पोलिसांनी मिरजगाव – कर्जत रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी मिरजगावच्या दिशेने येणारी ओमिन (एम. एच.४२ एएस ५६९५ ) यास थांबून गाडीची झडती घेण्यात आली. या झडतात एका काळे रंगाच्या पिशवीमध्ये गांजा असलेल्या पुड्या मिळून आल्या. त्याचे वजन पाच किलो सातशे ग्रॅम इतके होती.ओमिनी गाडीतून दोघे जण गांजा विक्रीसाठी प्रवास करत होते.
यावेळी पोलिसांनी ओमिनी गाडी व सहा किलो गांजाचा मुद्देमाल जप्त करत हेमंत किसन टिळेकर (वय ३६ रा. उरळीकांचन जि. पुणे) व संतोष नथू सावळे (वय ३१ रा. तांबे वस्ती उरुळी कांचन जि. पुणे) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या टीमसह कर्जत पोलिसांनी संयुक्तपणे केली.
कारवाईच्या पथकात कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार रवींद्र वाघ, वैभव सुपेकर, महादेव कोहक, संतोष फुंदे, जितेंद्र सरोदे सह आदींचा समावेश होता.
कर्जत उपविभागात गेल्या तीन दिवसांत गांजाविरोधी दोन मोठ्या कारवाया झाल्या. DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवायांमध्ये सुमारे दहा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये अत्तापर्यंत 4 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गांजा उत्पादकांच्या नांग्या ठेचल्या जात असतानाच गांजा विक्री करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी आणखी धडक कारवाया हाती घेण्याची आवश्यकता आहे.