नविन शैक्षणिक धोरणातून कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होणार – डॉ. दिलीप पवार, हळगाव कृषि महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : हळगाव कृषि महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमात स्वतःचा विकास करावा,आत्मविश्वास बाळगावा, स्वतःला व्यक्त करायला शिकावे, आवडते छंद जोपासावे. आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे आणि आपला पाया मजबूत करावा. कृषि क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. या क्षेत्रात काहीतरी नविन आणि वेगळे शिकण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे अधिष्ठाता (कृषि) तथा संचालक शिक्षण डॉ. दिलीप पवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील कृषि पदवी अभ्यासक्रम २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात नव्याने दाखल झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा नवीन शैक्षणिक धोरणात नव्याने सामविष्ठ केलेला अभिनव असा “दीक्षारंभ समारंभ” मोठ्या उत्साहात पार पडला.
नविन शैक्षणिक धोरण २०२० नुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने ‘सहाव्या अधिष्ठाता’ समितीचा प्रस्तावित केलेल्या नविन अभ्यासक्रमाचे कृषि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्साहात स्वागत करून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून त्याची अंमलबजावणी करावी असे अवाहन डाॅ पवार यांनी केले.
सदर अभ्यासक्रम हा कौशल्याभिमुख असल्याचे तसेच कृषि क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कृषी प्रमाणपत्र मिळणार आहे. दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर कृषी पदविका प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी असे अभिनव उपक्रम सामविष्ठ असल्याचे विद्यार्थ्यांना डॉ पवार यांनी समजावून सांगितले.
रॅगिंग ही कृषि महाविद्यालयातील परंपरा नसल्यामुळे महाविद्यालय किंवा वसतिगृहातील परिसरामध्ये रॅगिंगची घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे असा सल्ला अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना चांगला अभ्यास करावा, वसतिगृहातील जीवनाचा आनंद घ्यावा, त्याबरोबरच कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी सांगितले. महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत अशा महात्मा फुले कृषि विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या शासकीय कृषि महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता (कृषि) तथा संचालक शिक्षण मा. डॉ. दिलीप पवार हे होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या विविध उपक्रमांचा अहवाल मांडला. कार्यक्रमात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला परिचय उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना करून दिला.
दरम्यान, अधिष्ठाता (कृषि) तथा संचालक शिक्षण आणि कुलसचिव यांनी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगणाचा विकास करण्यासाठी सहयोगी अधिष्ठाता व संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. याप्रसंगी अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. रवी आंधळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.