जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड बाजार समिती निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला विखे गटाची उघड साथ मिळाली आहे.ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे. यंदा होणाऱ्या या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ गायवळ यांनी आमदार प्रा राम शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भाजप व मित्रपक्ष प्रणित जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारासाठी प्रा सचिन गायवळ यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.
18 जागांसाठी जामखेड बाजार समितीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आमदार प्रा. राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार या आमदारद्वयींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ हे कोणाला साथ देणार याची संपूर्ण मतदारसंघाला उत्सुकता होती. गायवळ यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जात असलेल्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ हे मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी झंझावती दौरे सुरु केले आहेत.
जामखेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गायवळ यांनी मागील काही वर्षांपासून तालुक्यात मोठे काम उभे केले आहे. युवा वर्गात त्यांची मोठी लोकप्रियता आहे. गायवळ यांच्या पाठीशी जामखेड तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक यांची ताकद आहे. बाजार समिती निवडणुकीत प्रा सचिन गायवळ हे आमदार प्रा राम शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्यामुळे आमदार प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे. जामखेड तालुक्याबरोबर कर्जत तालुक्यातही गायवळ यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याचा मोठा फायदा भाजपला या निवडणुकीत होताना दिसणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. रविवारी गायवळ यांनी विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सर्व उमेदवार तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारनंतर गायवळ यांनी व्यक्तीगत गाठीभेटी घेत अनेकांशी संवाद साधला. गायवळ यांनी प्रचारासाठी कंबर कसल्याने भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे. प्रा सचिन गायवळ यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.