State Women Commission Chairperson Rupalitai Chakankar warning : सरपंचांनो सावधान…अन्यथा तुमचं सरपंचपद जाणार
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा इशारा
State Women Commission Chairperson Rupalitai Chakankar warning | जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनत चालला आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात बालविवाहांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता गावगाड्यातील सरपंचांची खुर्ची धोक्यात येणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर (State Women Commission Chairperson Rupalitai Chakankar) नुकत्याच जामखेड दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी जामखेड टाईम्सशी संवाद साधत असताना त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती दिली.
यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2016 यानुसार कोणताही बालविवाह झाला तर तो बालविवाह करून देणाऱ्या मुलीचे आईवडील, करून घेणाऱ्या मुलाचे आईवडील, मंगल कार्यालय, भटजी आणि फोटोग्राफर इतक्याच लोकांवरती गुन्हा दाखल होत होता. पण गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या कालावधीमध्ये बालविवाहाचे प्रमाणे हे सर्वाधिक आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये बालविवाहाचं प्रमाण होतं तितक बालविवाहाचं प्रमाण सध्या वाढलं आहे.
एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रोखलेले बालविवाह 105 आहेत. नोंदी न झालेले बालविवाहांची संख्या 450 च्या आसपास आहे. म्हणजे एका जिल्ह्यात बालविवाह पाचशे ते साडेपाचशेच्या संख्येत आहेत. संपुर्ण महाराष्ट्र लाखाच्या संख्येने बालविवाह होतात. पण ही अनिष्ट परंपरा आहे. या बालविवाहांमुळे त्या मुलीवरती लवकर बाळंतपण लादलं जातं, या बाळंतपणात तिचा मृत्यू होतो. त्यामुळे मातामृत्यू आणि बालमृत्यू यांचं देखील प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.
तुम्हाला आणि आम्हाला वाटतं असेल की, उद्याचा महाराष्ट्र सक्षम व्हावा, निरोगी व्हावा, सुदृढ व्हावा पण अश्या वेळेस बालविवाहांचं वाढतं प्रमाण हे धोकादायक आहे. उद्याची पिढी सुदृढ समजण्याऐवजी आपण तिला तळाला घेऊन जातोय कारण की त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ झालेली नसते. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 10 दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला याची शिफारस राज्य शासन व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे.
काय आहे राज्य महिला आयोगाचा निर्णय?
अत्तापर्यंत बालविवाह प्रतिबंधक कायदा 2016 नुसार ज्या लोकांवर गुन्हा दाखल होत होता त्या कायद्यामध्ये दुरूस्ती करून आता ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्या लग्नाची खोटी नोंद करणारे रजिस्टर अधिकारी यांच्यावर तो गुन्हा सिध्द झाल्यास तात्काळ पद रद्द करण्यात यावं असा निर्णय महिला आयोगाने घेतला आहे.
जो पर्यंत लोकप्रतिनिधी बालविवाह रोखण्याच्या चळवळीमध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत बालविवाह रोखले जाणार नाहीत त्याच्यामुळे महिला आयोगाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह वाटतो. बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येतात. समाजाने या चळवळीत सहभागी व्हावे असे अवाहन चाकणकर यांनी केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली यापुढे कामाची काय दिशा असेल या प्रश्नावर बोलताना रूपालीताई चाकणकर म्हणाल्या की, आमचे नेते शरद पवार साहेब व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करते. कारण संघटनेत काम करणाऱ्या एका सर्वसामान्य कुटूंबातील महिलेला राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं. संघटनेचा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते.
राज्य महिला आयोगाच्या माध्यमांतून महिलांना सुरक्षितता देणं, त्यांच्या मनामध्ये असलेली असुरक्षिततेची भावना दुर करणं, समाजात असलेल्या अनिष्ट रूढी परंपरांना पायबंद घालणं, बालविवाह असेल लैंगिक अत्याचार असतील, कौटुंबिक हिंसाचार असेल या सगळ्यांनाच पायबंद घालत राज्य महिला आयोग महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनीला आपला आयोग वाटावा आपलं माहेर वाटावं इतक्या चांगल्या पध्दतीचं काम आयोगाच्या माध्यमांतून येत्या काळात निश्चितपणे होईल असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.
सरकारला दोन वर्षे झाले कसं पाहता ? या प्रश्नांवर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासून कोरोनाच्या कालावधीमध्ये ‘पालक’ या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी सरकारने साकार करून दाखवला. कोरोनाच्या कालावधीमध्ये विरोधकांनी विरोधाचं राजकारण केलं. कोणत्याही पध्दतीचं सहकार्य त्यांनी केलं नाही. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला कायम दुय्यम वागणूक दिली.
परंतू न डगमगता महाराष्ट्र सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलं. जनतेला चांगल्या पध्दतीच्या आरोग्य सुविधा दिल्या. जनतेला धीर दिला. कोरोनाविरोधातली लढाई सरकार ताकदीनं लढलं. हे जनतेचं सरकार आहे. येणाऱ्या कोणत्याही संकटामध्ये महाविकास आघाडी सरकार जनतेच्या बाजूने कायम उभे राहील.हे दोन वर्षाचं यश आहे हे जनता चांगल्या पध्दतीने अनुभवतेय.
येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या पध्दतीने जनतेच्या हिताचे निर्णय घेईल.महिला भगिनींसाठी सुध्दा महाविकास आघाडी सरकारने चांगल्या पध्दतीचे निर्णय घेतले.विशेषता: महिला पोलिस कर्मचाऱ्यांची जी 12 तासांची ड्यूटी होती ती 8 तासांवर आणण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला.
विरोधकांनी कितीही काही बोलू दे, ही त्यांच्या मनातली मळमळ आहे, खंत आहे. आपण सत्तेत येऊ शकलो नाही हे त्यांना पचत नाहीये. फक्त विरोधाला विरोध करायचा ही त्यांची भूमिका आहे. जनता महाविकास आघाडीसोबत असल्याने हे सरकार अतिशय उत्तमपणे काम करत आहे आणि यापुढेही करत राहिल असा विश्वास चाकणकर यांनी जामखेड टाईम्स सोबत बोलताना व्यक्त केला.