संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची तोफ जामखेडमध्ये धडाडणार, जाहीर सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज सरसावला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमरण उपोषण अंदोलनाच्या माध्यमांतून सरकारला जेरीस आणून मराठा समाजाच्या आरक्षणाचा ऐतिहासिक लढा पुकारणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौर्यावर निघाले आहेत. या दौर्यातून ते मराठा आरक्षणाच्या अंदोलनाची मशाल धगधगत ठेवणार आहेत. त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांची पुढील महिन्यांत जामखेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. उद्या 29 रोजी जाहीर सभेच्या नियोजनासाठी जामखेडमध्ये व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामधील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणी 17 दिवस आमरण उपोषणाचे अंदोलन केले. त्यांचे हे अंदोलन देशभर गाजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व इतर नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करत या अंदोलनावर तोडगा काढला. सरकारला एक महिनाचा अवधी देण्याच्या अटीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले अंदोलन स्थगित केले. सरकारने दिलेल्या शब्दांपासून फारकत घेऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन जाहीर सभा घेणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची 6 ऑक्टोबर 2023 रोजी जामखेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी जामखेड शहरातील साई मंगल कार्यालयात उद्या 29 सप्टेंबर 2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यातील समाज बांधवांनी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे 30 सप्टेंबर पासून महाराष्ट्र दौर्यावर निघणार आहे. मराठवाड्यातील 8 जिल्हे, अहमदनगर व नाशिक असे एकुण दहा जिल्ह्यातील मराठा बांधवांशी ते जाहीर सभांच्या माध्यमांतून संवाद साधणार आहेत. हा दौरा संपल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटी या गावात ते मोठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे.