जामखेड टाइम्स वृत्तसेवा । संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनानिमित्त पुण्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने संभाजी ब्रिगेडने अहमदनगर जिल्ह्यात तयारी हाती घेतली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांनी दिली.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. साळुंखे, प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख, डॉ.जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, प्रसिध्द अभिनेते भरत जाधव, सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले, आदि मान्यवर या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दि 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. खा.श्रीनिवास पाटील हे या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने, तसेच अभिनेते अशोक समर्थ आणि लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सायंकाळी साडेपाच वाजता या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे या समारोपीय समारंभात अध्यक्षस्थानी असणार आहेत. या मान्यवरांच्या शुभहस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख व डॉ.जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे या समारोपीय समारंभात उपस्थित राहणार आहेत. शाल, स्मृतिचिन्ह आणि व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात विविध महत्त्वपुर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दु.12 ते 1:30 या वेळात संभाजी ब्रिगेडच्या ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या संकल्पनेवर आधारित “खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरचा भारत आणि जग” या विषयावरील चर्चासत्र पार पडणार आहे. या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सकाळ समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे सहभागी होणार आहेत.
दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात “एकविसावे शतक – स्टार्टअप्सचे युग” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ आणि प्रसिध्द अभिनेता निखील चव्हाण हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच या वेळात संभाजी ब्रिगेडच्या ‘मराठा कम्युनिटी बिजनेस कम्युनिटी’ या महत्वाकांक्षी धोरणाच्या अनुषंगाने “आरक्षणाकडून अर्थकारणाकडे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक सतिश मगर, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फॉर्म्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे, सिल्व्हर ज्युबली मोटर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर राजवर्धिनी जगताप आणि बिव्हीजी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर हणमंत गायकवाड हे चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
संभाजी ब्रिगेडने तरुणांसाठी अर्थकारणाची चळवळ सुरु केली असून या अधिवेशनाच्या माध्यमातुन अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे.याविषयी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी sambhajibrigade.org या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांनी केले आहे.