Electricity substation | शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या गावाला रोहित पवारांकडून अनोखी भेट !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या जन्मगाव असलेल्या दिघोळ गावाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अनोखी भेट देण्यात आली आहे. (Unique gift from Rohit Pawar to Shiv Sena MP Sadashiv Lokhande’s village, Electricity substation sanctioned to Dighol village,)

खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे जन्मगाव असलेल्या दिघोळ आणि परिसरातील गावांना सातत्याने विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागायचे.या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला होता. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे. त्यानुसार दिघोळ गावाला 33/11 वीज उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे.(power substation sanctioned in dighol ) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न यामुळे निकाली निघाला आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ, जातेगाव, जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, माळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या वीज पंपांना, गावातील घरगुती व इतर ग्राहकांना खर्डा येथील 33/11 वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु उपकेंद्रापासून ही गावे दूर असल्याने पुरेशा दाबाने व व्यवस्थित वीज पुरवठा होत नव्हता यामुळे या भागातील शेतकरी वीज समस्येने त्रस्त होते.

आमदार रोहित पवार यांच्याकडे याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या, या भागाची वीज समस्या सोडविण्यासाठी या भागात वीज उपकेंद्र असणे आवश्यक होते. हीच बाब हेरून पवार यांनी नव्या उपकेंद्रास मान्यता मिळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. नवे वीज उपकेंद्र दिघोळ येथे मंजूर झाले आहे. ज्यामुळे परिसरात अखंडित व उच्च दाबाने वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी दूर होणार आहेत.

खर्डा उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या खर्डा, सातेफळ, लोणी, वाकी यांसह इतर वाड्या वस्त्यांनाही खर्डा उपकेंद्रावरील ताण कमी होणार असल्याने फायदा होणार आहे.यापूर्वी नायगावला वीज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. त्याचे काम देखील सध्या प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे आसपासच्या 7-8 गावांना फायदा होणार आहे आणि राजुरी उपकेंद्रवरील येणारा ताण कमी होणार आहे.

यासोबतच मतदारसंघात काही ठिकाणी सोलार प्रकल्पदेखील उभारण्यात आले असून विविध ठिकाणी नवीन लिंक लाइनचे काम, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, शेतातील नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे यांसह अनेक ठिकाणी नव्याने वीज उपकेंद्रांची उभारणी करणे अशा पद्धतीने विजेच्या संदर्भातील विविध अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून होत आहे.

राशीनच्याही उपकेंद्राची क्षमता वाढवून होणार 20 केव्ही

राशीन येथील उपकेंद्रावर येणारा ताण लक्षात घेता त्याची देखील क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार आता राशीन येथील उपकेंद्राची पूर्वी असणारी 15 के.व्ही ची क्षमता 5 के.व्हीने वाढवून ती 20 के.व्ही करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात विजेचा होणारा लपंडाव कायमचा बंद होणार आहे. तसेच कर्जत तालुक्यातील राशीन येथील 33/11 वीज उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या चिलवडी, परीटवाडी, तळवडी येथील फिडरवर येणारा ताण आता क्षमता वाढल्याने कमी होणार असून परिसरातील वीजग्राहक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.