जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात कर्जत नगरपंचायतची निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे. या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार हा संघर्ष उफाळून आला आहे.
भाजपच्या प्रभाग 14 मधील अधिकृत उमेदवाराला राष्ट्रवादीने पुळवून नेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला भाग पाडल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी भाजपच्या सभेत उमटले. भाजपच्या सर्वच नेत्यांनी या घटनेचा जोरदार समाचार घेतला परंतू सर्वाधिक चर्चा रंगली ती मुबीन बागवान या कार्यकर्त्याच्या आक्रमक भाषणाची.
यावेळी बोलताना मुबीन बागवान यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या दडपशाहीची जोरदार चिरफाड केली. कर्जत नगरपंचायत निवडणूक विरोधकांनी खालची पातळीवर नेली. आमच्या उमेदवारांवर दबाव, दडपशाही आर्थिक आमिष दाखवत निवडणूकीतून माघार घ्यायला लावली असा जोरदार हल्लाबोल बागवान यांनी केला.
बागवान पुढे म्हणाले की, आपल्या घरात कोणी सरकारी नोकर नाही. त्यामुळे विरोधक आपले काही करू शकत नाही. मी साधा फळ विक्रेता आहे. पण आता मी राम शिंदेचा साधा कार्यकर्ता झालो आहे. मी भाजपाकडून अर्ज भरला होता. मात्र ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली होती त्याच्यासाठी रत्नमाला साळुंकेताई आणि मी उमेदवारी अर्ज काढून घेतला.
मात्र त्याच उमेदवाराने भाजपाचा आणि माजीमंत्री राम शिंदे यांचा विश्वासघात केला व राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता समोरच्यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर सर्वसामान्य मतदारांनी नोटाचा पर्याय वापर करावा व प्रभाग १४ ची पुन्हा निवडणूक घ्यायला लावावी असे अवाहन यावेळी बागवान यांनी केले.
रविवारी भाजपने आयोजित केलेल्या सांगता सभेत मुबीन बागवान यांनी जोरदार हल्लाबोल करत 21 रोजी मतदान करताना नोटा या बटणाचा वापर करून सामान्य जनतेची ताकद काय असते हे राष्ट्रवादीला दाखवून देण्याचे अवाहन केले. बागवान यांच्या या भूमिकेवर प्रभाग 14 मधील जनता कसा प्रतिसाद देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.