भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे दोन महिने सुट्टीवर का गेल्या होत्या? कारण काय? खुद्द पंकजाताईंनी केला उलगडा, जाणून घ्या सविस्तर!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “मला तुमच्याकडून ना जरी काठीच्या साडीची अपेक्षाय, ना फुलांच्या वर्षावाची अपेक्षाय, मला तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षाय ती म्हणजे माझी साथ कधी सोडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुध्दा जीवात जीव असेपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. माझा आर्यमान जसा मला आहे, तसेच तुम्ही सगळे मला आहात, तुमचे हार पोहचले, तुमचे सत्कार पोहचले, मी तुम्हाला वचन देते की, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही, मी थकणार नाही, मी रूकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही, अशी गर्जना भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी जामखेडमध्ये बोलताना केली.”
भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे ह्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत.शनिवारी पंकजाताई यांची यात्रा जामखेडमध्ये दाखल झाली. आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपने पंकजात़ाई मुंडे यांचे जामखेडमध्ये भव्यदिव्य स्वागत केले. जामखेड येथील खर्डा चौकात पंकजाताई मुंडे यांचे आगमन होताच दहा जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण केली. यावेळी क्रेनद्वारे भव्य असा हार घालून पंकजाताई यांचे जामखेडकरांनी स्वागत केले. पंकजाताई यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरात तुफान गर्दी उसळली होती. आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या भव्य दिव्य नियोजनामुळे पंकजाताई मुंडे यांचे जामखेडमध्ये विराट स्वागत पार पडले. भाजपा नेते आमदार प्रा राम शिंदे व हजारो कार्यकर्त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे जंगी भव्य स्वागत केले. या स्वागतानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
“यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, पाऊस असताना, बाजारचा दिवस असताना देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ताई हे केवळ आणि केवळ मुंडे साहेबांचं असलेलं कर्जत- जामखेडकरांवरच प्रेम आणि तुमचा असलेला आशिर्वाद त्यामुळे आपल्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केलीय. ताईंच्या शिव-शक्ती परिक्रमा दौर्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खऱ्या अर्थानं आता तुम्हाला आम्हाला पुढचा काळ खुणावतोय,असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.”
“यावेळी बोलतानाना भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, माझी शिवशक्ती परिक्रमा आहे. ही साधी परिक्रमा होती. पाच पन्नास लोक सोबत घेऊन पाच पन्नास लोकांना भेटावं, देवीचं दर्शन घ्यावं, हा या परिक्रमेचा उद्देश होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या जीवनात आदर्श राहिलेल्या आहेत. जसं त्यांनी महादेवाची भक्ती केली. तशी महादेवाच्या भक्तीचा बीज माझ्याही हृदयामध्ये आहे. त्यामुळे मी शिवशक्ती परिक्रमासाठी बाहेर पडले. मला माहित होत की, शिव आणि शक्तीच्या बरोबर तुमच्या सुध्दा शक्तीची साथ मला मिळेल. मला अपेक्षा होती की तुम्ही मला मोठ्या संख्येने साथ देणार आहात. ती अपेक्षा खरी ठरली आहे.”
“पंकजाताई पुढे म्हणाल्या, ही माझी शिवावरची, शक्तीवरची भक्ती आहे आणि तुमची मुंडे साहेबांवरची भक्ती आहे. तुम्ही जरी मुंडे साहेबांची भक्ती करत असाल तर तुमची शक्ती कोणयं? असा सवाल करताच उपस्थितांनी पंकजाताईऽऽ पंकजाताई ऽऽ असे म्हणत जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर पंकजाताई म्हणाल्या, मला स्वता:ला माझी शक्ती वाढवावी लागेल. ताई तुम्ही या महाराष्ट्रात फिरा असा मला लोकांचा आग्रह आहे, पण मला पक्षाने जबाबदारी दिली होती मध्यप्रदेशची. त्यामुळे दोन वर्षे झाले मी सतत मध्यप्रदेशमध्ये आहे. तिथे सुध्दा लोक भरभरून प्रेम करत आहेत. महाराष्ट्रातील लोकं म्हणत होते ताई भेटायला या ऽऽ भेटायला या, पण कसं भेटावं लोकांना, त्यात पुन्हा दोन महिने मी सुट्टीवर गेले नव्हते बरका, फक्त वैतागून म्हणलं आपण सुट्टीवर जाऊ आणि गेले.”
पंकजाताई पुढे म्हणाल्या, कुठं बोलावं, काहीतरीच लावतयं, पोस्टमार्टेमच करतयं, म्हणलं नकोच, दोन महिने आपण आपलं अध्यात्माचं जीवन जगावं, त्यावेळी प्रत्येक जण म्हणायचं कशी सुट्टी जाहिर केली ? संपून जाताल, पण मी संपून जाणाऱ्यातली नाही. मी दोन महिने सुट्टी घेतली. दोन महिने सुट्टी घेतली ती विचार करण्यासाठी, माझे काही प्रश्न सोडविण्यासाठी, माझ्याकाही जबाबदाऱ्यातून त्या हलक्या करण्यासाठी, आता परत तुमच्या चरणी माझ्या सेवेचा अभिषेक करण्यासाठी मी तयार आहे, असे म्हणत पंकजाताई यांनी आगामी राजकीय वाटचालीचे आपले इरादे स्पष्ट केले.
यावेळी पंकजाताई पुढे म्हणाल्या, मी म्हणायचे थांबा, वाट पहा, जो कोणी मला म्हणायचा असं करू नका, तसं करू नका, सुट्टी घेऊ नका, त्यांना म्हटलं थांबा, वाट पहा, सुट्टी नंतर परत आलेय अन् आता समोर पहा हा जनसागर. शिवशक्ती परिक्रमा करताना लोकांनी प्रचंड प्रेम दिलं. मला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला फुलांच्या पाकळ्याच दिसायल्यात.पाकळ्याच दिसायल्यात, मी उभी राहिली तरी फुलांचा ढिगभर ढिग साचतोय.मी नको म्हणतं असते लोकांना पण कार्यकर्ते काही ऐकत नाहीत.माझी एवढीच इच्छा असते, कासव जसं एकटक कसा आपल्या लेकराला पाहतं असतो, तसं, जिथं आहे तेथून मला टक लावून बघा, आशिर्वाद द्या, असे भावनिक आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.