जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Manoj Jarange Patil : मराठा समाजाला सरसकट ओबीस आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंदोलन हाती घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रेद्वारे मुंबईच्या दिशेने कुच केली आहे. पदयात्रेद्वारे ते मुंबईच्या दिशेने निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पदयात्रा धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, काही षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडल्या तरी एकही इंचही मागे हटणार नाही. काही गडबड झाली तर अशावेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभे रहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी पाथर्डी तालुक्यातील आगसखांड (ता.पाथर्डी) येथे पदयात्रेत बोलताना केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील मीडसांगवी (ता. पाथर्डी) येथे दाखल झाली. हजारो मराठा समाजबांधवांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. तरुणांसोबत महिलाही या पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. या पदयात्रेचे फुंदे टाकळी फाटा आणि आगसखांड येथे दुपारी आगमन झाल्यानंतर या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. (Manoj Jarange Patil)
पिठले-भाकरीचे भोजन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? सात महिने वेळ दिला. आता सरकारला एक ताससुद्धा वेळ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, हे निश्चित आहे. सरकारने आम्हाला त्रास किंवा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील हे पदयात्रेद्वारे मुंबई धडकणार आहेत. या पदयात्रेत लाखो नागरिक सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नाही.(Manoj Jarange Patil )