राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्या – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची मागणी

पुणे : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. तसेच राजकीय पर्यावसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Writer Sharad Gore should be given chance as member of maharashtra Legislative Council appointed by Governor - demand of senior writer Shripal Sabnis

शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९३ साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे वीस हजार सभासद असून आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेर देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.

नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन , महात्मा फुले साहित्य संमेलन , छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन , बेळगाव मराठी साहित्य संमेलन ,ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा यामध्ये समावेश आहे.

साहित्यिक शरद गोरे यांनी एकूण १० ग्रंथाचे आजवर लेखन  केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. यामुळे बुधभूषणकार अशी त्यांची ख्याती आहे.

युगंधर प्रकाशन या संस्थेचे ते संपादक व प्रकाशक आहेत.  या संस्थेने आजवर १४४ दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत.त्यांनी लेखक, दिग्दर्शक व संगीतकार म्हणून पाच चित्रपट व एक नाटक केले आहे. ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, प्रेमरंग , एक प्रेणादायी प्रवास सूर्या ऐतवी ,फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे.

उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्रास परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत.