धक्कादायक:आईच्या प्रियकराकडून लेकीने उकळली खंडणी !
आईच्या प्रियकराला धडा शिकवायला गेली पण डाव लेकीवर उलटला
pune news today पुणे : आईच्या प्रियकराला धडा शिकवण्याचा डाव मुलीने टाकला खरा पण प्रकरण पोलिसांत गेल्यावर हा डाव तरूणीवरच उलटला आहे.आईच्या कथित प्रेमसंबंधाचे पुरावे सोशल मिडीयावर वायरल करण्याची धमकी देत मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराकडून लाखो रूपयांची खंडणी उकळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी यांचा बिल्डींग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. मे महिन्यात दोघेजण त्यांच्या दुकानात आले. साहित्याची चौकशी असताना त्यातील एकाने शिवीगाळ करत तुझे एका महिलेच्या संबंध आहेत त्याचे फोटो आमच्याकडे आहेत असे म्हणत एकाने सॅकमधून काही तरी काढत फिर्यादीच्या पोटाला लावले व फिर्यादीला कारमध्ये बसवून अलंकार पोलिस चौकीजवळ घेऊन गेले होते.कारमध्ये मारहाण करून फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत त्यामधील फोटो व व्हिडीओ घेतले. ते व्हडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. महिन्याला एक लाख व आठ महिन्यानंतर सर्व पैसे द्यायचे,असे धमकावले होते.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी सर्व माहिती महिलेला सांगितली. तसेच, त्यांना घाबरू न जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिलेने हा सर्व प्रकार त्यांच्या मुलीस सांगितला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या मुलीस फोन करून फिर्यादी यांना एक लाख रूपये घेऊन कात्रज परिसरात येण्यास सांगितले.असे दोन वेळा आरोपींनी दोन लाख रूपये घेतले.यासाठी फिर्यादींनी त्यांच्याकडी गाडी देखील विक्री केली.मात्र आरोपींचा पैशासाठी तगादा लावल्यानंतर फिर्यादीने गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली होती.
तांत्रिक तपासात झाला उलगडा
त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते. निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक संदीप बुवा यांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार तपासाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना सुरूवातीला मुलीवरच संशय आला होता. तांत्रिक विश्लेषनाद्वारे तिची गोपणीय माहिती काढली असता ती सुरुवातीपासूनच आरोपीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी अतिशय सावधपने काम करत तिला पत्ता लागू दिला नाही. आरोपींचा राहिलेले पैसे मागण्यासाठी फोन आल्यानंतर पहिल्यांदा डेक्कन परिसरात सापळा रचला. पण, आरोपींनी त्या ठिकाणी पैसे न घेता दगडूशेठ गणपती मंदिर परिसराजवळ पैसे घेतले. त्यानंतर आरोपी गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तरुणीच्या सांगण्यावरून हा सर्व कट रचल्याचे उघडकीस आले.
प्रेमसंबंधाचा सुगावा अन् व्हॉट्सअॅप केले हॅक
फिर्यादी व्यवसायिक आणि आरोपी तरुणीच्या आईचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिला मिळाली होती. त्यामुळे तिने आईचे व्हॉटस्अॅप हॅक करून सर्व फोटो काढून घेतले. त्यानंतर ते फोटो मित्र गायकवाड याला पाठविले. सुरुवातीला फिर्यादीला धडा शिकवायचा असे ठरले होते. मात्र त्यांनी फिर्यादींना बदनामी करण्याची धमकी देत 15 लाखाच्या खंडणीची मागणी केली. खासगी क्षणातील फोटो मिळाल्यानंतर गायकवाड याने मित्राच्या मदतीने
गायकवाडने फेडले कर्ज तर तरुणीने केली शॉपींग
आईच्या प्रियकराकडून काही रक्कम उकळल्यानंतर आरोपी गायकवाड याने मिळालेल्या पैशातून कर्ज फेडले तर तरुणीने शॉपींग केली. गायकवाड व तरुणीचे मागील पाच सहा वर्षापासून प्रेमसंबध आहेत. गायकवाड हा विवाहीत आहे. तरी देखील त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरूणी बीबीएच्या दुसर्या वर्षाला शिकते. फिर्यादी यांना खंडणीची मागणी आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून करत होते. त्यामुळे फिर्यादी खूपच घाबरले होते. आरोपी तरुणीने तिची आई दोन क्रमांक वापर होती. त्यापैकी एक क्रमांकाचे आरोपीच्या मोबाईलवर व्हॉट्स ऍप सुरू करून दिले होते. त्यावरून आरोपी फिर्यादी यांना फोन करत होते. फिर्यादींचा व्यवसाय लहान आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम नव्हती. आरोपींनी त्यांच्याकडे 15 लाखांची खंडणी मागितल्यामुळे बदनामीच्या पोटी काही पैसे दिले. गाडी विकल्यानंतर पुढील महिन्यात पैसे देण्यासाठी त्यांची बुलेट गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. पैसे देण्यास उशीर झाला की आरोपी त्यांना मारहाण करत होते. त्यामुळे त्यांनी खूपच धसका घेतला होता.
पैसे देताना तरुणी प्रत्येक वेळी सोबत
प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यांतर तरुणीने आरोपींना पैसे देऊन हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला आईलाच दिला होता. आईचा प्रियकर जेव्हा आरोपींना पैसे देण्यासाठी जात असे तेव्हा तरुणी देखील सोबत असायची. प्रत्येक महिन्याचा तारखेला पैसे मागण्यासाठी आरोपींचा फोन देखील तरुणीच्या मोबाईलवरच येत असे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेत तरुणी आली होती. त्यानुसार पोलिस तिच्यावर नजर ठेवून होते. तांत्रिक विश्लेषनात ती सुरूवातीपासूनच आरोपी गायकवाड यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. तेव्हापासून पोलिसांचा संशय तिच्यावर बळावला होता.
मुख्यसुत्रधार तरूणी अटकेत
मिथून मोहन गायकवाड (वय 29, रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि कर्वेनगर परिसरातील 21 वर्षीय तरूणी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली. याबाबत एका 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.