Z P Election 2022 | जामखेडच्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांनो वाजवा फटाके, उधळा गुलाल आणि साजरा करा आनंदोत्सव कारण…

तर मग ठरलं : 3 जिल्हा परिषद गट 6 पंचायत समिती गण 

 

सत्तार शेख । जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Z P Election 2022 | अगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जामखेड तालुक्यात पूर्वीप्रमाणे 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण अस्तित्वात यावेत यासाठी आग्रही असलेल्या सर्वपक्षीयांच्या मागणीला यश आल्याचे दिसत आहेत.त्यामुळे आता जामखेड तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनो वाजवा फटाके, उधळला गुलाल आणि साजरा करा आनंदोत्सव असेच चित्र निर्माण झाले आहे.

जामखेड तालुक्यात तिसरा जिल्हा परिषद निर्माण करण्यासाठी जामखेड तालुका प्रशासनाने काम सुरू केले आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

जामखेड नगरपरिषदेच्या निर्मितीमुळे एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण संपुष्टात आले होते. तेव्हा लोकसंख्येचा निकष पूर्ण न झाल्याचे बोलले गेले होते. पाच वर्षांत नवमतदारांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणेच 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण अस्तित्वात यावेत अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून जोर धरू लागली होती. विशेषता: राष्ट्रवादीकडून यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. आमदार रोहित पवार यांनी यात विशेष लक्ष घातले होते. नव्या जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीमुळे राष्ट्रवादीत होणारी संभाव्य बंडाळी मात्र आता काहीशी टळणार आहे.

सध्या निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांचे प्रारूप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. जामखेड तालुक्यातील तिसरा जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नव्या जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीसाठी वेगाने पाऊले उचलली आहेत.

सध्या जामखेड तालुक्यात जवळा व खर्डा हे दोन जिल्हा परिषद गट अस्तित्वात आहेत. तर हळगाव, जवळा, खर्डा, साकत हे चार पंचायत समिती गण अस्तित्वात आहेत. नव्याने निर्माण होणार तिसरा जिल्हा परिषद गट हा वरील दोन्ही जिल्हा परिषद गटातील गावांचे विभाजन होऊन तयार होणार आहे. सन 2011 च्या जनगणना गृहित धरून नवा जिल्हा परिषद गट अस्तित्वात आल्यास अनेक गणिते बदलणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या मतदारसंख्येवर नवा जिल्हा परिषद गट अस्तित्वात यावा अशी अनेकांची इच्छा आहे.

नवा जिल्हा परिषद गट तयार करताना सोईच्या गावांची पळवा पळवी होऊ शकते. यातून राजकीय समीकरणे बदलू शकतात. सध्या जे नेते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तयारीत होते. त्यांच्या आजवरच्या मेहनतीला पाणी पडणार आहे.

नवा जिल्हा परिषद गट अस्तित्वात आल्यानंतरच इच्छुकांना नव्याने मोर्चेबांधणी हाती घ्यावी लागेल.  कुठल्या गावाला जिल्हा परिषद, पंचायत गण या नावांचा मान मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार. यातूनही अनेक वेगळे समीकरणे तयार होतील.

दरम्यान तिसऱ्या जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीमुळे सर्व राजकीय पक्षात आनंदाचे वातावरण आहे. दोन गटात इच्छुकांची मोठी संख्या होती. यातून मग बंडाळी कशी थोपवायची याची चिंता सर्वच पक्षांना होती. मात्र आता तिसऱ्या गटाच्या निर्मितीमुळे अनेकांचे पुनर्वसन होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित

तूर्तास जामखेड तालुक्यात अस्तित्वात येणाऱ्या तिसऱ्या जिल्हा परिषद गट निर्मितीची प्रक्रिया जामखेड तालुका प्रशासनाने वेगाने हाती घेतली आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी तालुका प्रशासन जिल्हा प्रशासनाला संभाव्य नव्या जिल्हा परिषद गटाचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतर हरकती सुचना मागवून अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केला जाईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.