जिल्हा परिषद निवडणूक 2022 : जामखेड तालुक्यात होणार ‘माधव’ पॅटर्नचे पुनरुज्जीवन? पवार विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा भडकणार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांसाठी गट आणि गणनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर झाली. जामखेड तालुक्यात 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गण आहेत. आरक्षण सोडत जाहीर होताच इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. इच्छुकांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर गुलाल आपलाच अश्या पोस्ट टाकत धुराळा उडवण्याचा धडाका लावला आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जामखेड तालुक्यात दोन गट अस्तित्वात होते. यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी एक गट वाढला आहे. त्यामुळे यंदा तीन गट झाल्याने सर्व राजकीय पक्षांत मोठा उत्साह होता. आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जिल्हा परिषद निवडणूक 2022 साठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली, यात जवळा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, साकत गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर खर्डा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे.
जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक नेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. तीन पैकी दोन गट महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक नेत्यांना आपल्या सौभाग्यवतींना निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. तर काहींना नाईलाजाने पंचायत समितीच्या राजकारणात सक्रीय व्हावे लागेल अशी सध्याची स्थिती आहे.
जामखेड तालुक्यात यतीन जिल्हा परिषद गट अस्तित्वात आहेत. यातील एका गटाची नव्याने निर्मिती झाल्याने गटांची पुर्नरचना झाली. यातून अनेक नेत्यांची हक्काची वोटबँक तुटली आहे. नवीन गावांचा गटातील समावेश सर्वच इच्छुकांसाठी दमछाक करणारा ठरणार आहे. नव्या मतदारांना आपलेसे करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
जामखेड तालुक्यातील सहा पंचायत समिती गणांचेही आरक्षण आज जाहीर झाले. पंचायत समिती निवडणुकीत अनेक मातब्बर नेते उमेदवारी करताना दिसणार आहेत. उमेदवारी देताना भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची मोठी कसरत असणार आहे. दोन्ही पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
‘माधव’ पॅटर्नचे होणार पुनरुज्जीवन
जामखेड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. जामखेड तालुक्याच्या राजकारणात अगामी काळात ओबीसी प्रवर्गाचा दबदबा राहणार आहे. एकही गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव न झाल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीमुळे जामखेड तालुक्यात पुन्हा ‘माधव’ पॅटर्नचे पुनरुज्जीवन होणार आहे. याच पॅटर्नचा अवलंब करुन अगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची राजकीय पेरणी होऊ शकते अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
राम शिंदे विरुद्ध रोहित पवार संघर्ष पुन्हा भडकणार
अगामी जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा संघर्ष पुन्हा भडकताना दिसणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूकीत या संघर्षाने वेगळे टोक गाठले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेेले.
गेल्या अडीच वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या भाजपाला राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागताच पुन्हा नवसंजीवनी मिळाली. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. त्यातच राज्यात भाजप प्रणीत सरकार सत्तेवर आल्याने भाजपात आता अधिकच उत्साह संचारला आहे. त्यामुळे यंदा जामखेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतितटीच्या, चुरशी आणि तुल्यबळ होणार आहेत.
शिंदे आणि पवार यांना मोठी ताकद लावावी लागणार
अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जामखेड नगरपरिषद, जामखेड बाजार समिती या निवडणुकांमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार या दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. कर्जत – जामखेड मतदारसंघावर वर्चस्व कोणाचे ही लढाई आता तीव्र होईल.मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे आणि पवार यांना मोठी ताकद लावावी लागणार आहे. पवार आणि शिंदे हे दोन्ही आमदारांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला येणार असेच संकेत मिळत आहेत.
‘माधव’ पॅटर्न म्हणजे काय ?
RSS च्या वसंतराव भागवतांनी 1980 साली भाजपात ‘माधव’ पॅटर्नचा पाया घातला. माळी धनगर आणि वंजारी या तीन समाजाची मोट बांधण्यासाठी राज्याच्या राजकारणात वसंतराव भागवतांनी माधव पॅटर्नचे अस्त्र आपल्या भात्यातील बाहेर काढले. स्व प्रमोद महाजन, स्व गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी राज्यातील ओबीसी समाजाची मोट बांधण्यासाठी ‘माधव’ पॅटर्नचा खुबीने वापर केला.याचा मोठा फायदा भाजपला झाला. शेटजी भटजींच्या पक्षाला त्यातूनच बहुजन चेहरा मिळाला. भाजपला सत्ता मिळाली.
माधव पॅटर्न कसा तयार झाला ?
- ‘मा’ म्हणजे माळी
- ‘ध’ म्हणजे धनगर
- ‘व’ म्हणजे वंजारी
- या फाॅर्म्यूल्याने ‘माधव’ पॅटर्न तयार झाला.
कर्जत – जामखेड मतदारसंघातही माधवं पॅटर्न भाजपसाठी अनेक निवडणूकांमध्ये फायदेशीर ठरला आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणूकीत या पॅटर्नचा वापर होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. जामखेड तालुक्यातील तीनही गट OBC साठी आरक्षित झाले आहेत. आता कोणता पक्ष अचूकपणे माधव पॅटर्नचे पुनरुज्जीवन करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जामखेड तालुका जिल्हा परिषद आरक्षण खालीलप्रमाणे
- जवळा गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
- खर्डा गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- साकत गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जामखेड पंचायत समिती आरक्षण खालीलप्रमाणे
- साकत गण – सर्वसाधारण
- शिऊर गण – अनुसूचित जाती स्त्री
- जवळा गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
- अरणगाव गण – सर्वसाधारण
- खर्डा गण – सर्वसाधारण
- नान्नज गण – सर्वसाधारण स्त्री