जामखेड टाईम्स वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. तसेच लग्नसराई सुरू आहे. राजकीय कार्यक्रम होत आहेत. नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. अश्यातच महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा मोठा धोका वाढला आहे. तसेच नियमित कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत.राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू केले आहेत. राज्यात रात्री 09 ते सकाळी 06 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेत पुन्हा लाॅकडाऊन लागणार का? याची भीती पसरली आहे.
राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागणार का ? राज्यातील कोरोनाची काय स्थिती आहे ? यासह आदी मुद्द्यांवर राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लाॅकडाऊन कधी लागणार यावर बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात ज्या क्षणी 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होईल त्या दिवशी राज्यात लाॅकडाऊन लावला जाईल अश्या स्पष्ट शब्दांत टोपे यांनी लाॅकडाऊन विषयी भाष्य केले.
राज्यात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. जगभरात ओमिक्रॉनच्या ज्या केसेस समोर येत आहेत ते पाहता ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग मोठा आहे. राज्यात ओमिक्रॉन दुप्पट वेगाने पसरतोय, त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगावी. ओमिक्रॉनसाठी ऑक्सिजनची जास्त गरज पडेल असे वाटत नाही. परंतु कोरोना होऊ नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. नियम पाळणे आवश्यक आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही, गरज नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. (When will the lockdown start in Maharashtra? Health Minister Rajesh Tope spoke clearly on this)
राज्यात एकाच वेळी गर्दी होऊ नये, त्यातून राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. खबरदारीच्या उपाययोजना सरकारने हाती घेतल्या आहेत. जनतेने घाबरून जाऊ नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात शुक्रवार 20 नवे ओमिक्रॉन रूग्ण आढळले होते. शुक्रवार अखेर राज्यात सक्रीय ओमिक्रॉन रूग्णसंख्या 108 इतकी झाली होती. आज शनिवारी ओमिक्रॉनचा किती आकडा येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.