Sanjay Shirsath News : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात गंभीर आरोप केल्यानंतर राज्याचं राजकारण भलतचं तापलं आहे.मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रत्येक मागणी मान्य करणाऱ्या सरकारने आता जरांगे यांच्या अंदोलनाची SIT चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता जरांगे यांच्या अंदोलनाला वेगळीच दिशा मिळाली आहे. त्यातच आता जरांगे यांच्या अंदोलनामागे वेगळ्याच राजकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप होऊ लागल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका आणि तीव्र झालेले अंदोलन याच्या मागे नेमकं कोण आहे ? यावर आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गेल्या ३-४ दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आंदोनाच्या आडून काही हिंसक घटना घडवण्याचा प्रकार सुरु आहे. काही ठिकाणी एकमेकांना चॅलेंज करण्याची भाषा वापरली गेली आहे. शांततेत चालणारं हे आंदोलन वेगळ्या मार्गाने गेल्याने सरकार याकडे गांभीर्याने बघत आहे.
शिरसाट म्हणाले, जरांगेंनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुर्ण केल्या आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही पुर्ण करण्यात आली आहे. परंतू, नंतर त्यांनी भुमिका बदलून आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केलं. पण काही राजकीय लोकांनी त्यावर शंका उपस्थित करुन त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम केलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आंदोलन शांत झाल्यास राजकीय पोळी भाजता येणार नाही यासाठी काही लोकांनी भांडणं लावण्याचं काम केलं. मराठा आंदोलकांचा याच्याशी काहीही संबंध नाही. परंतू, इतर लोकांनी त्यांना फुस लावण्याचा केलेला प्रयत्न हा दुर्दैवी आहे,” असे शिरसाट म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “जे काही अनुचित प्रकार घडले त्यामागे इतर लोकं होते ते आंदोलनातील नव्हते आणि त्यांच्यावर पोलिस कारवाई करत आहेत. आज सभागृहात एसआयटी चौकशी मागणी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये आंदोलकांना फूस लावणाऱ्यांना आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येणार आहे.”
“काही लोकं हे आंदोलन कसं पेटवता येईल याचा शांतपणे विचार करत होते.जरांगेंच्या सहकाऱ्यांनीच स्पष्ट केलं की, यामागे राष्ट्रवादीचे शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवार आहेत. हा सर्व चौकशीचा भाग असून चौकशी झाल्यानंतर ही सर्व नावं समोर येतील. राजकारणातले काही लोकं तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा,” असे आवाहन शिरसाट मराठा समाजातील लोकांना केले आहे.
मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवार आहेत, असे मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनीच सांगितलं असल्याचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेंचे हिंसक वक्तव्य लक्षात घेता मंगळवारी सरकारने मराठा आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. आमदार शिरसाट यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.