सविता डांगे यांच्या पुढाकारातून चौंडीत साकारण्यात आली 251 शिवलिंगे ! (With the initiative of Savita Dange,251 Shivlings were created in Choundi)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून सविता डांगे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत तब्बल 251 शिवलिंग साकारत महाशिवरात्री साजरी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मगाव आहे. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या पुढाकारातून 1995 पासुन चौंडी विकास प्रकल्प साकारला जात आहे. या ठिकाणी अनेक विकास कामे राबवण्यात आली आहे तर अनेक कामे होणे बाकी आहे. राज्यातील धनगर समाजाचे श्रध्दास्थान असलेले चौंडी राज्यातील महत्वाचे तिर्थक्षेत्र म्हणून आकारास येऊ लागले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या शिवभक्त होत्या. त्यांनी आपल्या सत्ताकाळात अनेक शिवमंदिरांचा जिर्णोध्दार व नव्या मंदिरांची निर्मिती केली होती.
शिवभक्त अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी इस्मामपुरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळाच्या अध्यक्षा सविताताई डांगे महाशिवरात्रीचे औचित्य साधत चौंडी गाठली. त्यांनी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेतले. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी दुपारपासुन शिवलिंग बनवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. मातीच्या गोळ्यांपासुन सुमारे 251 शिवलिंग साकारले. ओम नमः शिवाय चा गजर करत साकारलेल्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत ही शिवलिंगे भगवान शंकराला अर्पित करत चौंडीत महाशिवरात्रीचा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला.
यासंदर्भात बोलताना सविता डांगे म्हणाल्या की, राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या आपल्या सुख दु:खाचे गार्हाणे शंकराकडे मांडायच्या. दु:ख वाट्याला आले तरी त्यांनी जनतेची सेवा कधीच थांबवली नाही. अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर व्हावा यासाठी माझे सासरे आण्णासाहेब डांगे यांनी अहिल्यादेवींच्या चरित्रावर ग्रंथ लिहला आहे. त्यातुनच प्रेरणा घेऊन मी चौंडीत महाशिवरात्रीच्या दिवशी 251 शिवलिंग साकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी पती विश्वनाथ डांगे व दिर अॅड चिमणराव डांगे यांनी मला प्रोत्साहन दिले.