कर्जतमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत झालेल्या कामांचा जागतिक पातळीवर उल्लेख; इजिप्तच्या परिषदेत झाला कर्जतचा गौरव
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वोच्च पातळीवरील जागतिक पर्यावरण बदल परिषद ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील एकूण २०० हून अधिक देशांचा या परिषदेत सहभाग आहे.
सध्या सुरू असलेल्या या जागतिक परिषदेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग देखील सहभागी झाला आहे. या जागतिक परिषदेत कर्जत शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या कामांचा देखील सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. जी प्रत्येक कर्जतकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी २ ऑक्टोबर २०२० रोजी माझी वसुंधरा अभियान राज्यात सुरू झालं तेव्हापासून ते पहिल्या दोन वर्षात राज्यभरात जे पर्यावरण रक्षणाचे काम झालंय त्याचं सादरीकरण केलं. यामध्ये कर्जतमध्ये झालेल्या पर्यावरण रक्षणाच्या कामांचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कर्जतमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत सर्व सामाजिक संघटना, नगरपंचायत व सक्रिय लोकसहभागातून ५० हजार पेक्षा अधिक वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसीटी, डीप सीसीटी, सायकल ट्रॅक, गार्डन, रस्त्यालगतची वृक्ष लागवड इत्यादी झालेल्या कामाचा आपल्या सादरीकरणात दराडे यांनी उल्लेख केल्यामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्जतच्या या कामांचा उल्लेख झाल्याने आमदार रोहित पवार यांनी सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पर्यावरणप्रेमी नागरिक, कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच सुनंदाताई पवार यांचे अभिनंदन केले आहे.