AY.4.2 Corona variant found | चिंता वाढवणारी बातमी : इंग्लंडमध्ये धुमाकुळ घालणारा नवा व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळला !  

मुंबई: AY.4.2 Corona variant found | देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. देशातील अनेक भाग कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे  मात्र महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची चिंता वाढवणारी एक माहिती आता समोर आली आहे.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (AY.4.2) चा नवा प्रकार आढळून आला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये नव्या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळून आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

नॅशनल सेंटर ऑफ डिजीज कंट्रोलच्या जिनॉम सिक्वन्सिंग अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सात जणांपैकी दोन जण लष्कराचे अधिकारी असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली.मध्यप्रदेश सोबतच महाराष्ट्रातील एक टक्का नमुन्यांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.

डेल्टा AY.4.2. म्युटेशनवर संशोधन सुरू असल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनं २० ऑक्टोबरला दिली आहे.

या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे त्याला VUI-21OCT-01 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्हेरिएंटनं ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. डेल्टाच्या तुलनेत या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त आहे.