जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका जिल्ह्याला देण्यावरून आंध्र प्रदेशात हिंसाचार उसळला आहे. संतप्त अंदोलकांनी आंध्रप्रदेशचे परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपू (Pinipe Viswarupu) यांचे घर जाळले. मात्र, पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.
4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे करून कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्हा करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करून लोकांकडून हरकती मागवल्या होत्या. यानंतर कोनसीमा साधना समितीने (Konaseema Sadhana Samiti) नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली.
जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न सुरू असताना कोनसीमा साधना समितीने मंगळवारी आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि अखेर अमलापुरममध्ये (Amalapuram) जाळपोळ झाल्याची घटना घडली.
आंध्र प्रदेशात नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा (Konaseema) जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा (BR Ambedkar Konaseema) जिल्हा असे करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर येथील अमलापुरम शहरात हिंसाचार उसळला.
लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात पोलिसांची गाडी आणि शैक्षणिक संस्थेची बसही जाळण्यात आली. काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी जाळपोळ केल्याचा आरोप राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता (Taneti Vanitha) यांनी केला आहे. “या घटनेत जवळपास 20 पोलीस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करून दोषींना न्याय देऊ”, असे तानेती वनिता यांनी म्हटले आहे.