Agnipath scheme | अग्निपथ योजनेबाबत लष्कराची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेच्या हिंसाचारात सहभागी तरुणांसंदर्भात घेतला मोठा निर्णय
दिल्ली : एकीकडे अग्निपथ योजनेवरून (Agnipath Yojana) देशभरातील युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अग्निपथ योजना मागे घ्यावी अशी युवकांची मागणी आहे, मात्र दुसरीकडे सेनेच्या तिन्ही दलालांकडून अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यभरती प्रक्रिया (Agneepath Yojana Army Recruitment) सुरू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तशा वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आज सेनेच्या (Military) तीनही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात मोठी घोषणा करण्यात आली.
केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही असे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माहिती दिली.
लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की, येत्या 2030 सालापर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश यांचं कॉम्बिनेशन असलेल्या युवकांची गरज आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार आहे.अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय वायुसेना 24 जूनपासून भरती मोहीम सुरु करणार आहे. त्यानंतर लवकरच भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी केली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी सुरु करावी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
युवकांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
दरम्यान अग्निपथ योजनेवरून देशभरात सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे . अग्निपथ योजना मागे घ्यावी अशी मागणी करत देशभरातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे अनेक राज्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे. दरम्यान मोदी सरकारने हाती घेतलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच योजना मागे घ्यावी या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अग्निपथ योजनेवरून देशभरात हिंसक आंदोलन सुरूच
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळला आहे.आक्रमक युवकांकडून निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झालं आहे. अनेक रेल्वे गाड्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनामध्ये तब्बल 900 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेचं नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान युवकांकडून देशभरामध्ये सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सरकारने काही सवलती जाहीर केल्या आहेत, मात्र तरीह आंदोलक युवक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यामुळे या संदर्भात केंद्र सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या मुद्द्यावर तातडीने तोडगा न निघाल्यास या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशभर जाऊ शकते. त्यामुळे देशात परिस्थिती बिघडू शकते अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.