आष्टीच्या अविनाश साबळेने रचला इतिहास, 30 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला, जागतिक पातळीवर उंचावले भारताचे नाव
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील मांडवा या गावातील अविनाश साबळे या शेतकरी कुटुंबातील तरूण धावपटूने जागतिक पातळीवर अमेरिकेत झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमधील पाच हजार मीटर शर्यतीत (US 5000 m steeplechase) इतिहास रचला. या स्पर्धेत साबळने याने 30 वर्षापूर्वीचा बहादूर प्रसाद याने केलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि नवा इतिहास रचला. दुष्काळग्रस्त आष्टी तालुक्यातील तरूणाने केलेली कामगिरी जागतिक पातळीवर झळकली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला अविनाश साबळे हा आष्टी तालुक्यातील माडवा या गावचा रहिवासी आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश साबळे हा धावण्याचा सराव करत आहे. अविनाश साबळेने या आधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. पण त्याला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश आले नव्हते.
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. त्याने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस आणि पाच हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती भारतीय ॲथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
अविनाश साबळे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या धावण्याचा सराव पूर्ण केला. मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र धावण्यातून आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न अविनाश पाहतोय आणि त्यासाठी तो तेवढ्याच हिमतीने सराव देखील करतोय. आता येत्या काळात तो यशाची आणखी शिखरे सर करतोय का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अविनाश साबळे याने मिळवलेल्या यशामुळे अविनाशच्या गावातील गावकरी तसेच आष्टी तालुक्यातील जनतेकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
Avinash Sable breaks the 30-year-old record of Bahadur Prasad in 5000 meter race in San Juan Capistrano, USA.