भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले,दोन जणांचा मृत्यू, राजस्थानमधील बाडमेर दुर्घटनेचा व्हिडीओ आला समोर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय सैन्य दलाचे मीग फायटर विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना राजस्थानमधून समोर आली आहे. या अपघातात दोघा पायलटचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. (MiG-21 fighter aircraft crash in Barmer rajasthan)
राजस्थानमध्ये गुरुवारी रात्री मीग फायटर विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, आगीचे मोठ मोठे लोळ अकाशात उठले होते. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासनाचे पथक दाखल झाले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
यात अपघातानंतर विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे दिसत आहे. जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहे. हा भीषण अपघात राजस्थानमधील बारमेरमध्ये झाला. बैतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान पडले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी पोलिस-प्रशासनाला याबबात माहिती दिली. मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटरवर पसरला आहे.
गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी देखील भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. या अपघातात पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. विंग कमांडर हर्षित सिन्हा यांनी जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवरून नियमित विमानाने उड्डाण केले. अपघात स्थळ जैसलमेरपासून 70 किमी अंतरावर होते. विमानाला हवेत आग लागली, त्यानंतर ते जमिनीवर कोसळले होते. दरम्यान राजस्थानमध्ये मागील आठ वर्षांत सात लढाऊ विमाने कोसळली आहेत.