जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आज महाराष्ट्रात शिंदे -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन काही तास उलटत नाही तोच बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या नितिश कुमार यांनी भाजपची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. (big earthquake in Bihar politics, Chief Minister Nitish Kumar made big announcement, there was excitement in the country)
बिहारच्या राजकारणामध्ये मागील महिन्याभरापासून मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू होत्या. भाजपच्या अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दांडी मारली होती. नितीश कुमार भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत.
बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांची युती आज संपुष्टात आली आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घोषणेमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची आज बैठक घेतली या बैठकीत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत असलेले युती तोडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज चार वाजता बिहारच्या राज्यपालांची भेट घेऊन नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा करू शकतात अशी माहिती आता समोर येत आहे.
बिहारमध्ये नितेश कुमार यांचा पक्ष आता काँग्रेस आणि लालूप्रसाद यांच्या पक्षासोबत युती करून सरकार स्थापन करू शकतो अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे नितेश कुमार यांच्या या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मात्र आता मोठा भूकंप झाल्याचे चित्र आहे.