Breaking News : बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली राजीनाम्याची घोषणा !
बिहार : देशाच्या राजकारणात रविवारी पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र व त्याचबरोबर सरकार बरखास्त करण्याचे पत्र त्यांनी राज्यपालांना सोपवले. नितीशकुमार महागटबंधनमधून बाहेर पडणार अशी चर्चा गेल्या आठवड्या पासून सुरु होती. अखेर रविवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. नितीशकुमार हे भाजपा सोबत सरकार स्थापन करणार आहेत. नितीशकुमार यांचा आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे.
देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी रविवारी समोर आली. नितीशकुमार यांच्या पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमार यांनी घेतलेला निर्णय विरोधी आघाडीला मोठा धक्का देणार ठरला. इंडिया आघाडीला हा तिसरा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी तृणमूल कॉंग्रेस व आम आदमी पक्षाने बंगाल व पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत… राज्यातील जनतेच्या हितासाठी भाजप, JDU आणि इतर NDA मित्रपक्षांसोबत बिहारमध्ये NDA सरकार स्थापन करण्याचा ठराव सर्व आमदारांनी एकमताने मंजूर केला. विधिमंडळ पक्षनेतेपदी सम्राट चौधरी यांची तर उपनेतेपदी विजय सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरकार बरखास्तीची घोषणा केल्यानंतर भाजपच्या आमदारांची बिहारमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सम्राट चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. चौधरी हे नव्या सरकारमध्ये उपमुखमंत्री असतील असे बोलले जात आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले, “…सरकारमध्ये काम करण्यासाठी आज माझी विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. मी पक्ष नेतृत्व आणि सर्व आमदारांचे आभार मानतो…”
दरम्यान, JDU नेते के.सी. त्यागी म्हणाले, “काँग्रेसचा एक भाग भारत आघाडीचे नेतृत्व बळकावू इच्छित आहे. 19 डिसेंबर रोजी झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत षड्यंत्राचा एक भाग म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव भारत आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी सुचवण्यात आले वास्तविक मुंबईत जी बैठक झाली होती त्यात कोणाचेही नाव पुढे न करता इंडिया आघाडी काम करेल असे ठरवण्यात आले होते मात्र तसे पुढच्या बैठकीत झाले नाही.
त्यागी पुढे म्हणाले, “…देशाच्या राजकारणात आम्ही काँग्रेस पक्षाला मान्यता दिल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो, हा पक्ष राजकारणात अस्पृश्य बनला होता… TMC, AAP, समाजवादी पार्टी इत्यादी सर्व पक्षांनी भाजप व कॉंग्रेसला वगळून आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नितीश कुमार यांनी पुढाकार घेतल्यामुळे इंडिया आघाडी तयारी झाली. काँग्रेसला राजकारणात पुन्हा प्रस्थापित करण्याचे आणि तिला सन्मान देण्याचे काम आम्ही केले…”