भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोट येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज आर अश्विनने 500 वा बळी घेत दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत जाण्याचा मान मिळवला. हा क्षण भारतीय संघ साजरा करत असतानाच भारतीय क्रिकेट संघातून आर अश्विनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका मोठ्या कारणामुळे आर अश्विनने भारत – इंग्लंड तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या या निर्णयाला BCCI ने पाठींबा दिला आहे.
आर अश्विनने भारत – इंग्लंड तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती BCCI ने जरी केली आहे. त्यात म्हटले आहे की, रविचंद्रन अश्विनने कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे लगेचच कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देत आहे.
BCCI चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देत आहे. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्विन आणि त्याचे कुटुंब या आव्हानात्मक काळात मार्गक्रमण करत असताना बोर्ड त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते.
बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहतील आणि आवश्यकतेनुसार समर्थन देण्यासाठी संवादाच्या ओळी खुल्या ठेवतील. या संवेदनशील काळात चाहते आणि माध्यमांच्या समजूतदारपणाचे आणि सहानुभूतीचे टीम इंडिया कौतुक करते, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.