मीडियाच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांची कठोर शब्दांत टीका, चुकीची माहिती आणि अजेंडा चालवणे लोकशाहीला घातक  – सरन्यायाधीश एन व्ही रमणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशात सध्या मीडिया कांगारू कोर्ट चालवत आहे अशी कठोर टीका करत मीडियाच्या या भूमिकेमुळे कधी-कधी अनुभवी न्यायाधीशांनाही योग्य-अयोग्य ठरवणे कठीण जाते. अनेक न्यायालयीन मुद्द्यांवर चुकीची माहिती आणि अजेंडा चालवणे लोकशाहीला घातक असल्याचे यातून सिद्ध होत आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा (CJI NV Ramana in Ranchi, Jharkhand) यांनी झारखंड येथील एका कार्यक्रमाला संबोधित मांडले.

सरन्यायाधीश एन व्ही रमणा पुढे बोलताना म्हणाले की,आपण जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. मात्र, अशी प्रवृत्ती आपल्याला दोन पावले मागे घेऊन जात आहे. प्रिंट माध्यमांमध्ये अजूनही काही प्रमाणात उत्तरदायित्व आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जबाबदारी उरली नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सध्याच्या न्यायव्यवस्थेपुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे न्यायनिवाड्यासाठी बाबींना प्राधान्य देणे आहे. त्यामुळे न्यायाधीश सामाजिक वास्तवाकडे डोळेझाक करू शकत नाहीत. समाज वाचवण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी न्यायाधिशांनी दबाव टाकण्यात येणाऱ्या खटल्यांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

भारतीय न्यायालयीन प्रक्रियेत लोक अनेकदा प्रलंबित खटल्यांबाबत तक्रार करतात. मी स्वत: अनेक प्रसंगी प्रलंबित प्रकरणांचे मुद्दे मांडले आहेत. न्यायमूर्तींना त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी भौतिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज मी ठामपणे मांडत असल्याचे ते म्हणाले. न्यायमूर्तींचे आयुष्य खूप सोपे असते, असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, ही गोष्ट पचवणे फार कठीण असल्याचे ते म्हणाले.