ध्रुव जुरेल पुन्हा चमकला, चौथ्या कसोटीवर भारताचे वर्चस्व, इंग्लंडविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, भारताने 3-1 ने कसोटी मालिका जिंकली !
Ind vs Eng 4th test results: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवलेल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर भारताने कब्जा मिळवला. रांची येथे खेळवल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सने पराभव करत भारताने 3-1 ने कसोटी मालिका जिंकली. चौथ्या कसोटीत ध्रुव जुरेल हा भारतासाठी संकटमोचक म्हणून धावून आला. ध्रुव जुरेलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडला पुन्हा एकदा पराभूत केले. ध्रुव जुरेल हा चौथ्या कसोटीचा सामनावीर ठरला.
रांची कसोटीत भारताने तिसऱ्या दिवशी जबरदस्त पकड मिळवली होती. इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावांत 307 धावा केल्या. इंग्लंडचा संघ दुसर्या डावांत मोठी धावसंख्या उभारून भारतासमोर कठीण लक्ष्य देईल असे वाटत होते. परंतू भारतीय फिरकी गोलंदाज आर आश्विन व कुलदीप यादव यांच्या जादूई फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर अटोपला. भारताकडून आर आश्विन याने 5 तर कुलदीप यादव याने 4 तर रविंद्र जडेजाने 1 विकेट्स घेतल्या.
भारताने दुसर्या डावाची दमदार सुरुवात केली होती. भारताला विजयासाठी 192 धावांचे माफक आव्हान होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी तिसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 40 वर नेली. आज चौथ्या दिवशी शर्मा आणि जैस्वाल हे दोघेच विजय लक्ष्य गाठतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार दोघांनी खेळ सुरु केला होता. परंतू 84 धावांची भागीदारी होताच भारताची पहिली विकेट पडली. यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला. रोहित शर्माने अर्धशतक झळकावले तो 55 धावांवर बाद झाला त्याला टाॅम हार्टलीने बाद केले.
रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल बाद होताच भारताच्या झटपट 3 विकेट पडल्या. भारताचा निम्मा संघ तंबूत परतताच भारतावर पराभवाचे संकट घोंघावू लागले होते. बिनबाद 84 वरून 5 ल
बाद 120 अशी भारताची अवस्था झाली होती, परंतू पहिल्या डावातील हिरो ध्रुव जुरेल पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला. शुभमन गिल याच्यासोबत ध्रुव जुरेलने दमदार खेळी केली. दोघांनी विजयी लक्ष्य पुर्ण केले. भारताने इंग्लंडवर 5 विकेट्सने विजयी मिळवला. चौथ्या कसोटीत शर्मा आणि जैस्वाल बाद झाल्यानंतर रजत पाटीदार हा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. राजकोट कसोटीत दमदार खेळी करणारा सरफराज खान हाही रांची कसोटीतील दोन्ही डावांत अपयशी ठरला. रविंद्र जडेजा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल याने शुभमन गिलसह सावध खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. ध्रुव जुरेलने नाबाद 39 धावा केल्या तर शुभमन गिलने 52 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून दुसर्या डावांत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावली. ध्रुव जुरेलने पहिल्या डावांत 90 आणि दुसर्या डावांत 39 धावा केल्या. भारताला आवश्यकता असताना ध्रुव जुरेल संकटमोचक म्हणून संघाच्या मदतीला धावून आला. विकेटकीपर फलंदाज असलेला ध्रुव जुरेल हा भारताचा धोनी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेच त्याच्या कामगिरीवरून बोलले जात आहे.