IND vs ENG : रांची कसोटीवर भारताची मजबूत पकड, आर आश्विन आणि कुलदीप यादवच्या जादुई फिरकीपुढे इंग्लंडची शरणागती, भारताला विजयासाठी हव्यात इतक्या धावा
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. या सिरीजमधील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. भारताकडून ध्रुव जुरेलने भारताचा डाव सावरला. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरल्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाज आर आश्विन आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडचे कंबरडे मोडले. दोघांनी 9 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर आटोपला.
इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने दुसऱ्या डावात 40 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी केवळ 152 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विन, कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांची खेळी लक्षवेधी ठरली.
इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने रांची टेस्ट सामन्यात फलंदाजी करताना 90 धावांची कामगिरी केली. ध्रुवने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक ठोकले. हे अर्धशतक त्याने वडिलांना समर्पित केले. ध्रुवचे वडील निम चंद हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर होते. त्यांनी कारगिल युद्धात योगदान दिले होते. अर्धशतक पूर्ण केल्यावर ध्रुव जुरेलने मैदानात आपल्या वडिलांना कडक सेल्युट ठोकला. सध्या या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्टार गोलंदाज कुलदीप यादवने तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तब्बल 4 विकेट्स घेतल्या. त्याने 15 ओव्हरमध्ये केवळ 22 धावा देऊन 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. कुलदीप यादवने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची घेतलेली विकेट अधिक लक्षवेधी ठरली. कुलदीपची फिरकी पाहून बेन स्टोक्स सुद्धा बुचकळ्यात पडला. 33 व्या ओव्हरचा तिसरा बॉल कुलदीपने स्टोक्सला टाकला त्यावेळी, बॉल लेगला पिच झाल्यावर फिरकी बॅटला चकमा देत पॅडला लागली आणि दोन्ही पायांच्या मधोमध जाऊन स्टंपला बॉलवर जाऊन आदळला. बेन स्टोक्सला काही समजण्यापूर्वीच तो बाद झाला. सध्या कुलदीपने घेतलेल्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आर अश्विनने तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तब्बल 5 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने आतापर्यंत तब्बल 35 वेळा टेस्ट क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. यासह अश्विनने भारताचे माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड देखील मोडला. अश्विन भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावे होता त्यांनी भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने इंग्लंडचा फलंदाज ओली पोपची घेतलेली विकेट त्याची 351 वी विकेट ठरली.
भारतीय संघाला विजयासाठी इंग्लंडने 192 धावांचे आव्हान दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवस अखेर भारताने 40 धावा बनवल्या. रोहित शर्मा हा 24 धावांवर तर यशस्वी जैस्वाल हा 16 धावांवर नाबाद आहेत. सोमवारी रांची कसोटीचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारतीय संघ विजयी लक्ष्य पार करण्याच्या इराद्याने मैदानात खेळताना दिसेल. इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.