बिहारमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग, सात पक्षांनी दिला नितीशकुमार यांना पाठिंबा, बुधवारी होणार नव्या सरकारचा शपथविधी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अजूनही ठोस तोडगा निघालेला नसतानाच क्रांती दिवसाच्या मुहूर्तावर बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी NDA मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. भाजप सोबतची युती तोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलासह अन समविचारी पक्षांसोबत बैठक करत महागठबंधनची (महाविकास आघाडी) घोषणा करत नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. (Experiment of Mahavikas Aghadi in Bihar, seven parties supported Nitish Kumar, swearing-in ceremony of new government will be held on Wednesday)
बिहारच्या राजकारणात गेल्या महिन्यांपासून जदयू आणि भाजपात धुसफुस सुरू होती. भाजपने महाराष्ट्रात केलेला प्रयोग बिहारमध्ये होऊ शकतो अश्या पध्दतीने भाजपकडून डावपेच खेळले जात होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षातील नेत्यांना भाजपकडून सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती.
उलट जदयू पक्ष संपवण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू होते. याची भनक लागल्यापासून नितीशकुमार सावध झाले होते. सावध झालेल्या नितीशकुमारांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद वाढवला होता. यातूनच भाजपा सोबतच्या सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षांच्या पाठबळावर सत्ता स्थापन्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
त्यानुसार 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी NDA तून बाहेर पडण्याची घोषणा करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सोपवला. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरी आयोजित बैठकीला नितीश कुमार पोहचले. त्यानंतर नितीश कुमार यांची महागठबंधनच्या नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.
बिहारी नवे मुख्यमंत्री नितीश कुमार तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे असणार आहे, काँग्रेस, डाव व इतर छोटे पक्ष सरकारमध्ये सहभागी असणार आहेत. सात पक्षांनी एकत्र येत महागठबंधनची घोषणा केली आहे. या सरकारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडे गृहमंत्री तसेच विधानसभा अध्यक्षपद जाणार आहे.
एकिकडे भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली असताना हिंदी भाषिक पट्ट्यातील बिहार सारख्या महत्वाच्या राज्याची सत्ता भाजपला गमवावी लागल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या एकाधिकारशाहीच्या धोरणाविरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षांना बळ देणारी घटना म्हणून बिहारमधील राजकीय भूकंपाकडे पाहिले जात आहे.
बिहारमध्ये महागठबंधनचे नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. यात 7 पक्षांचा समावेश आहे. 164 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यपालांना सोपवले आहे. नव्या सरकारचा बुधवारी दुपारी चार वाजता शपथविधी पार पडणार आहे. नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणार याची यादी गठबंधनच्या नेत्यांनी जवळपास निश्चित केली असल्याचेही बोलले जात आहे.