आयसीसीकडून टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा, भारतीय संघातील या 4 खेळाडूंचा टीममध्ये समावेश; कोण आहेत ते खेळाडू ? जाणून घ्या सविस्तर । ICC U19 World Cup 2024 Team of the Tournament
ICC U19 World Cup 2024 Team of the Tournament : यंदा दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन संघांचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेची फायनल मॅच (Final match) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघात झाली. फायनलमध्ये दमदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची निवड करत टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंनी स्थान मिळवले आहे.
दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेतून भविष्यातील मोठे खेळाडू तयार होतात. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंच्या कामगिरीचे सर्व देशांचे लक्ष असते. भारताकडून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस आणि सौम्य पांडे (Uday Saharan, Mushir Khan, Sachin Dhas, Soumya Pandey) सह आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने 11 सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात भारताचे 4 खेळाडू आहेत. विजेत्या ऑस्ट्रेलियाचे 3, यजमान दक्षिण आफ्रिकेचे 2, पाकिस्तानचा 1, वेस्ट इंडिजचा 1 अश्या 11 खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे कर्णधारपद विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वीबगेन याच्याकडे देण्यात आले.
आयसीसी टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये भारताकडून भारताचा कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस आणि सौम्य पांडे या चौघांना स्थान देण्यात आले आहे. भारताचा कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस या तिघांनी संपुर्ण स्पर्धेत दमदार फलंदाजीचे सर्वोत्तम प्रदर्शन घडवले. तर सौम्य पांडे याने दमदार गोलंदाजी करत फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. भारतीय संघाच्या प्रत्येक विजयात सहारन, खान, धस, पांडे या चौघांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत त्यांची टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये आयसीसीने निवड केली.
आयसीसीने निवडलेल्या ICC U19 World Cup 2024 Team of the Tournament मधील भारतीय खेळाडूंची कामगिरी खालील प्रमाणे
मुशीर खान (भारत) 7 सामन्यात 360 धावा आणि 7 विकेट्स
भारतीय संघात मुशीर खान या अष्टपैलु खेळाडू यंदा चमकदार कामगिरी केली. त्याने संपुर्ण स्पर्धेत बॅट आणि बॉलने कमाल करून दाखवली. आयर्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली. संपुर्ण स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारा मुशीर खान हा एकमेव खेळाडू ठरला.सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मुशीरने दुसरे स्थान पटकावले. सेमीफायनल आणि फायनलमध्ये तो बॅटने प्रभाव पाडू शकला नाही. परंतू एक गोलंदाज म्हणून त्याने 3 विकेट्स घेतल्या. परंतू संपुर्ण स्पर्धेत त्याने सात विकेट्स घेतल्या. भारतीय संघातील हुकमाचा एक्का म्हणून मुशीरला पाहिलं जायचं. मुशीरने फलंदाज म्हणून खेळलेल्या अप्रतिम खेळीने विरोधी संघात धडकी भरवली होती.
उदय सहारन (भारत) 7 सामन्यात 397 धावा
भारतीय कर्णधार उदय सहारन हा भारतीय संघाचा आधारस्तंभ म्हणून संपुर्ण स्पर्धेत खेळताना दिसला. संपुर्ण स्पर्धेत त्याने दोन अंकी धावा केली. अपवाद होता तो अंतिम सामन्याचा. यात तो स्वस्तात बाद झाला. त्याने अवघ्या आठ धावा केल्या. U19 विश्वचषक 2024 स्पर्धेत सहारन याने बांगलादेश आणि आयर्लंडविरुद्ध लागोपाठ अर्धशतके झळकावली. त्यानंतर नेपाळविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले.या खेळीदरम्यान त्याने सचिन धससोबत विक्रमी 215 धावांची भागीदारी केली, जी U19 विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक आहे.उपांत्य फेरीत त्याने 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सहारन याच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपुर्ण स्पर्धेत वर्चस्व मिळवले. सहारन च्या रूपाने भारताला एक चांगला फलंदाज मिळाला.
सचिन धस (भारत) 7 सामन्यात 303 धावा
दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सचिन धस या युवा खेळाडूने दक्षिण आफ्रिकेतील उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्टीवर दमदार कामगिरीचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवत सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने संपुर्ण जगाचे लक्ष वेधले. सचिन धसने बांगलादेश आणि आयर्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली. नेपाळविरुद्धच्या अंतिम सुपर सिक्स सामन्यात त्याला वरच्या क्रमवारीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. याच संधीचा फायदा उठवत सचिन याने कर्णधार सहारनसोबत विक्रमी भागीदारी रचत शानदार शतक झळावले. त्याने 116 धावांची खेळी केली. धसने उपांत्य फेरीत आपला फॉर्म कायम ठेवला. त्याने कर्णधारासोबत 171 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दडपणाखाली खेळण्याची क्षमता दाखवत, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 96 धावांची खेळी केली. तो नर्वस नाईंटीनचा शिकार बनला. संपुर्ण स्पर्धेत सचिनने छाप सोडली.
सौम्य पांडे (भारत) 7 सामन्यात 18 विकेट
भारतीय संघातील डाव्या हाताचा फिरकी खेळाडू असलेल्या सौम्य पांडेने संपुर्ण स्पर्धेत आपल्या फिरकी गोलंदाजीची छाप सोडली. त्याने संपुर्ण स्पर्धेत 18 विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा खेळाडू ठरला.सौम्य पांडेने U19 विश्वचषकात आपल्या डाव्या हाताच्या फिरकीने जादू केली. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चार विकेट्सने त्यानंतर आयर्लंडविरुद्ध तीन विकेट्स घेऊन पांडे याने स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्यानंतर न्यूझीलंड आणि नेपाळविरुद्ध चार विकेट्स मिळवल्या. त्यानंतरच्या सामन्यातही त्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात सौम्य पांडे ची दमादार कामगिरी सहायक ठरली. भारताचा उगवता फिरकी गोलंदाज म्हणून पांडेची चर्चा सुरू झाली आहे.
ICC U19 टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळाले ?
आयसीसीने अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातून टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा केली आहे. संघ पुढील प्रमाणे : लुआन ड्रे प्रीटोरियस (यष्टीरक्षक), हॅरी डिक्सन, ह्यू वीबगेन (कर्णधार), मुशीर खान, उदय सहारन, सचिन धस, नाथन एडवर्ड, कॅलम विडलर, उबेद शाह, क्वेना मफाका आणि सौम्य पांडे.