राजकोट कसोटीत भारताचा इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने मिळवला सर्वात मोठा विजय !
IND vs ENG 3rd Test Results : राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा तब्बल 434 धावांनी पराभव करत इतिहास घडवला. इंग्लंडला दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 122 धावांमध्ये गुंडाळून कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले.
राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना पार पडला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध द्विशतक ठोकलं. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान यांनी केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने 430 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 500 हुन अधिक धावांचे आव्हान दिले होते. (IND vs ENG 3rd Test Results)
इंग्लंडची टीम विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आली, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना फारकाळ मैदानात टिकू दिले नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतले. तर कुलदीप यादवने 2 तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेऊन इंग्लंडचा डाव अवघ्या 122 धावांमध्ये गुंडाळला. टीम इंडियाचा राजकोट येथील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी विजय झाला असून हा भारताचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. (IND vs ENG 3rd Test Results)
भारताने यापूर्वी 2021 मध्ये न्यूझीलंडवर 372 धावांनी विजय मिळवला होता. तर 2015 मध्ये दिल्ली येथे साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांच्यावर 337 धावांनी विजय मिळवला होता. तर आता इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे झालेल्या टेस्ट सामन्यात भारताचा 434 धावांनी विजय झाला आहे. त्यामुळे हा भारताच्या आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. (IND vs ENG 3rd Test Results)