IND vs PAK, T20 World Cup 2021 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीये. सामन्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तानने आपला संघ जाहीर केलाय. (IND vs PAK T20 World Cup 2021 Pakistan announces squad against India)
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील 12 सदस्यीय संघात अनुभवी आणि अखेरच्या टप्प्यात संघात समावेश झालेल्या शोएब मलिकचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट संघाने 12 खेळाडूंची नावे जाहीर केली असून यातील 11 जण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसतील.
क्रिकेटच्या नियमावलीनुसार, अंतिम प्लेइंग इलेव्हनची यादी ही नाणेफेकीनंतर जाहिर केली जाते. त्यामुळे पाकिस्तानने जाहिर केलेला संघ अंतिम आहे, असे म्हणता येणार नाही. अखेरच्या टप्प्यात त्यांना बदल करायचा झाल्यास तो बदल शक्य आहे. 24 आक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे.
आतापर्यंतच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला टीम इंडियाविरुद्ध एकही विजय नोंदवता आलेला नाही. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ पाच वेळा समोरासमोर आले आहेत. यात पाचही वेळा टीम इंडियाने बाजी मारली आहे. यावेळी भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयी षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आपली खराब कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
टीम इंडियाविरुद्ध असा असेल पाकिस्तानचा संघ
बाबर आझम, कर्णधार, रिझवान, फखर झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, असिफ, इमाद, शदाबस हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस, हैदर.