भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीवर भारताची मजबूत पकड : शर्मा गिल यांची शतके तर जैसवाल, खान, पड्डिकल यांची अर्धशतके, भारताच्या ७ बाद ४२७ धावा, भारताकडे २०९ धावांची आघाडी
India vs England 5th Test Live update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली. यशस्वी जैसवाल, सरफराज खान व देवदत्त पड्डिकल यांनी अर्धशतके झळकावली. शेवटचे वृत्त हाती येई पर्यंत भारताने ७ बाद ४२७ धावा केल्या आहेत. भारताकडे सध्या २०९ धावांची आघाडी आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर भारताच्या दोन्ही सेट फलंदाजांना बाद करण्यात इंग्लंडला यश आले. बेन स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर जेम्स अँडरसनने दुसरा शतकवीर शुबमनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर आलेल्या सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. पड्डिकलने पदार्पणात अर्धशतक झळकावून विक्रम नोंदवला.
इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनाही संघर्ष करावा लागेल असे वाटले होते. पण, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी अगदी सहजतेनं धावा कुटल्या अन् पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. यशस्वी ५९ चेंडूंत ५७ धावा करून माघारी परतला. पण, रोहित व शुबमन गिल ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी आक्रमक फटकेबाजी करताना आपापले शतक पूर्ण केले व भारताला आघाडी मिळवून दिली.
लंच ब्रेकनंतर मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. तब्बल २५१ दिवसानंतर त्याने टाकलेला पहिलाच चेंडू भारतीय कर्णधार रोहितचा त्रिफळा उडवणारा ठरला. रोहित १६२ चेंडूंत १०३ धावांवर बाद झाला. स्टोक्सने टाकलेला चेंडू रोहितला स्तब्ध करणारा होताच, परंतु स्लीपमध्ये उभा असलेला मार्क वूडही अवाक् झाला. पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने भारताला मोठा धक्का दिला. त्याने १५० चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह ११० धावा करणाऱ्या शुबमनचा त्रिफळा उडवला.
पदार्पणवीर देवदत्त पड्डिकलने आक्रमक फटकेबाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. पहिल्या ३० चेंडूंत केवळ ९ धावा करणाऱ्या सर्फराजने पुढील २५ चेंडूंत ४२ धावा कुटल्या आणि ५५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. टी ब्रेकनंतर सर्फराजला बाद करण्यात शोएब बशीरला यश आले. सर्फराज ६० चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर देवदत्त पड्डिकल हा शतक झळकावणार असे वाटत असताना त्याला शोएब बशीरने बाद केले. तो ६५ धावांवर बाद झाला.
त्यानंतर ध्रुव जुरेल हा मोठा फटका मारण्याच्या नादात १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच रवींद्र जडेजा हा १५ धावांवर बाद झाला. सध्या मैदानावर आर आश्विन व कुलदीप यादव हे दोघे शून्यावर खेळत आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत भारताने ७ बाद ४२७ धावा केल्या आहेत. भारताकडे सध्या २०९ धावांची आघाडी आहे.