देशात धुमाकुळ घालणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराच्या जामखेड पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | देशातील वेगवेगळ्या राज्यांत धुमाकुळ घालणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी गुरुवारी पार पाडली.
जे काम देशातील इतर राज्यातील पोलिसांना आजवर जमले नव्हते ते काम पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील जामखेड पोलिस दलाच्या टीमने फत्ते केले. या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान देशात अभिमानाने उंचावली आहे.
देशातील काही राज्यांमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या फरमान अली ऊर्फ फिरोज ऊर्फ समीरूद्दीन ऊर्फ उडा या कुविख्यात अश्या खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई गुरूवारी जामखेड पोलिसांकडून करण्यात आली आहे.
संबंधित गुन्हेगार हा इराणी टोळी संबंधित असुन तो फसवणुकीच्या गुन्हात अतिशय माहिर असा खिलाडी आहे. देशातील अनेक राज्यांच्या पोलिसांना तो गेल्या काही दिवसांपासून हवा होता. परंतू तो ज्या भागात जायचा त्या भागात वेषांतर करून राहायचा.
तसेच तरूणींना आपल्या जाळ्यात ओढून लग्न करायचा. चोरी, फसवणुक सह इतर अनेक गंभीर असे 30 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. अतिशय खतरनाक असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते.
परंतु संबंधित गुन्हेगार हा जामखेड परिसरात असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांकडून जामखेड पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी वेगाने तपास हाती घेतला.
गुन्हा शोध पथकाने संबंधित कुख्यात गुन्हेगाराला सिनेस्टाईल पाठलाग करत जेरबंद केले. संबंधित गुन्हेगाराला त्याच्या पत्नीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या धडाकेबाज कारवाईत चारचाकी गाडी व बनावट हिरे, माणिक, मोती, मोबाईल, बनावट आधारकार्ड, सिमकार्ड असा ऐवज जामखेड पोलिसांनी जप्त केला. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कुख्यात गुन्हेगारास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे.
या संपुर्ण कारवाईविषयी अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, मध्यप्रदेश राज्यातील नरवर (जि. शिवपुरी) पोलिस उपनिरीक्षक मनिष सिंह जादौन यांनी संपर्क करून कळविले की, राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करणारा व फसवणुक करणारा आरोपी फरमान अली उर्फ फिरोज उर्फ समिरुद्दीन उर्फ उड़ा नजीर अली हा अनेक गुन्हयात वरील राज्यातील पोलीसांना पाहिजे आहे परंतु तो मिळुन येत नाही.
त्याने काही दिवसापुर्वीच नरवर पोलीस स्टेशन हद्दीत सोने चोरी करून तो महाराष्ट्रात आला असून जामखेड परिसरात असल्याची शक्यता आहे अशी माहिती देत सदर गुन्हेगाराचे फोटो पाठविले होते.मिळालेल्या माहितीवर सदर गुन्हेगाराच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार करून व गोपनिय खबऱ्या मार्फत सदर आरोपीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असता 16 रोजी संबंधित गुन्हेगारास जामखेड शहरातील एका ठिकाणाहून त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उप निरीक्षक राजू थोरात, पोलीस अंमलदार अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी ,अरुण पवार ,संदीप राऊत ,संदीप धामणे ,संग्राम जाधव ,हनुमान आरसुल,संदीप आजबे ,मपो कॉ अनिता निकत सह आदींच्या पथकाने केली.