Manmohan Singh Death News : भारताचे माजी पंतप्रधान,थोर अर्थतज्ज्ञ, उदारमतवादी धोरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन
Manmohan Singh Death News : देशाचे माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे आज २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२ वर्षी त्यांचे निधन झाले. प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरु होते. परंतू उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १२ मे २००४ रोजी ते भारताचे १३ वे पंतप्रधान बनले होते. त्यांनी सलग दहा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.
अत्यंत संयमी, मितभाषी परंतु प्रचंड विद्वान असलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री ते पंतप्रधान अशी महत्वाची पदे भूषवली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मिळालेल्य सर्व पदांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी आर्थिक मंदीच्या संकटापासून देशाला वाचविण्याचे ऐतिहासिक काम केले होते. त्यांच्या निधनामुळे देश एका थोर व्यक्तिमत्वाला मुकला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.
डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.
यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले.
तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
1987-1990 पासून जिनिव्हा. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रध्दांजली
भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताने अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिंना उजाळा दिला आहे. ते लिहितात” इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहील यात शंका नाही, डॉ. मनमोहन सिंग जी! माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणाने कोट्यवधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले.”
शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि देशाच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या मोठ्या योगदानामुळे त्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाईल.
या दुःखाच्या क्षणी, मी त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळो.
भारताच्या विकास, कल्याण आणि समावेशकतेच्या धोरणांना चालना देण्याचा त्यांचा चिरस्थायी वारसा कायम जतन केला जाईल. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो.”
“भारताची स्वप्ने घडवणारे एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व, जे माझे आयुष्यभराचे ज्येष्ठ सहकारी होते. अत्युच्च समर्पणाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी पदे मिळवली. अशा मार्गदर्शकाच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो.
त्यांच्या मंत्रिमंडळात मी कामगार मंत्री, रेल्वे मंत्री आणि समाज कल्याण मंत्री म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे.”
राजकारणाच्या खडतर जगात एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणून ते जगले – प्रियंका गांधी
काँग्रेसच्या नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी लिहितात, “राजकारणात सरदार मनमोहन सिंग जी यांनी जितका आदर कमावला तितका आदर फार कमी लोकांना मिळतो.
त्यांचा प्रामाणिकपणा आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. विरोधकांनी केलेला अन्याय आणि गंभीर वैयक्तिक टीकेला तोंड देऊन देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहिलेल्या आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते गणले जातील.
मनमोहन सिंग शेवटच्या श्वासापर्यंत समतावादी, ज्ञानी, दृढनिश्चयी आणि धाडसी राहिले. राजकारणाच्या खडतर जगात एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणून ते जगले.”
भारतानं आज एक थोर सुपुत्र गमावला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, ” माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं तीव्र दुःख झालं. भारताच्या आर्थिक प्रवासाची दिशा ठरवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून त्यांची भूमिका राहील.
अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या या नेत्यानं कायम देशहिताला प्राधान्य दिलं. मी भाजप अध्यक्ष असताना अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येकवेळी माझ्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव पडला.
भारतानं आज एक थोर सुपुत्र गमावला आहे. डॉ.सिंग यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
ओम शांती”
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस
“आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाने आपण एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी गमावले आहेत.भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान, पंतप्रधान म्हणून 10 वर्षे देशाची सेवा करणे, हे कायम स्मरणात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांना हे दुःख पचवण्याचे धैर्य मिळो.” अशी श्रध्दांजली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहितात, “देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अतिशय कठिण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करुन दिला.देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आपली अद्वितीय बुद्धिमत्ता आणि नम्रतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे. त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लिहितात, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एक सत्यवादी आणि सभ्य व्यक्तिमत्व असलेले महान अर्थतज्ञ होते. त्यांचं निधन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी हानी आहे.”
भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंह यांनी रचला – अजित पवार
भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल, याची काळजी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झालं आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांना आहे. त्यांच्या निधनानं देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. मी डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.