नवी दिल्ली, दि 6 एप्रिल : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आज (Sharad Pawar Modi Meet) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये पवार काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत लक्षद्वीप प्रश्नासह महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर खुलासे केले.
गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तीन नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली. दरम्यान, मंगळवारी (5 एप्रिल) रोजी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या दादरमधील घरावर टाच आणली. याशिवाय त्यांच्या जवळच्या असलेल्या प्रवीण राऊत आणि पाटकर यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली होती. ही कारवाई झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
राज्यातील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष अनेकदा ताणला जातो आहेत. अशातच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा होणंही स्वाभाविकच आहे. दरम्यान, नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी मोदींसोबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा केली होती.
या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबत खुलासे करत पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांनाही उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्वाची वक्तव्य केली.
शरद पवारांनी मांडलेले मुद्दे खालील प्रमाणे
- महाराष्ट्र विकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार
- राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत
- राज्यपालांनी 12 आमदारांवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही
- 12 आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करुन काय निर्णय घेतात ते बघुयात
- संजय राऊतांच्या कारवाईबाबत नरेंद्र मोदींना सांगितलं आहे
- नवाब मलिकांच्या कारवाईवर कोणतीही चर्चा मोदी भेटीमध्ये झाली नाही
- राज्यातील कारवायांबाबत मोदींसोबत चर्चा नाही
- राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे
- इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही
- मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ