What is MSP? : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि,19 नोव्हेंबर 2021 रोजी कृषीविषयक तीन कायदे (Farm Laws) रद्द करण्याची घोषणा केली. मोदींनी शेतकऱ्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं आहे. मात्र शेतकरी अंदोलनावर ठाम आहेत. संसदेत कृषीविषयक कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाणार नाही तोवर अंदोलन (Farmer Protest) सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
सरकारवर आमचा विश्वास नसल्याचं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलंय. याशिवाय, सरकारनं किमान हमीभाव (एमएसपी) द्यावा आणि याबाबत कायदा करावा. यासोबतच वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्यात यावे, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत यातील एमएसपी म्हणजे काय?(What is MSP ?) याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एमएसपी म्हणजे काय? (What is MSP?)
सरकारकडून शेतकऱ्यांना 24 पिकांवर हमीभाव दिला जातो, ज्याला किमान हमीभाव किंवा एमएसपी MSP असंही म्हंटलं जातं. सरकारनं ज्या पिकांसाठी एमएसपी निश्चित केला आहे, ती पिके ते ठराविक दरानेच खरेदी करतात. त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता कमी असते. बाजारात पिकाची किंमत कितीही कमी झाली तरी, सरकारला शेतकऱ्यांकडून निश्चित केलेल्या किंमतीतच पिकांची खरेदी करावी लागते यालाच MSP म्हणतात.
एमएसपी कोणकोणत्या पिकांवर दिला जातो?
कृषी खर्च आणि मूल्य आयोग (कृषी मूल्य आयोग) दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील पिके येण्यापूर्वी एमएसपीबद्दल अभ्यास करते. सरकार तृणधान्ये, कडधान्ये आणि काही व्यावसायिक पिकांसह 24 पिकांसाठी किमान हमीभाव निश्चित करते. सरकारकडून त्या पिकांचे दर निश्चित केले जातात. त्यानंतर त्या भावानं शेतकऱ्यांकडून खरेदी केली जातात.
एमएसपीचा वाद का?
एमएसपीअंतर्गत शेतकर्यांना त्यांची पिके निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा कमी दरात विकण्याची सक्ती केली जात नाही. सरकारला निश्चित केलेल्या किंमतीतच या पिकांची खेरदी करावी लागते. कृषी कायद्यांद्वारे एमएसपी रद्द करण्याचा सरकारचा कट होता, असा आंदोलक शेतकऱ्यांचा युक्तिवाद आहे.